(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील गावडे–आंबेरे बिर्जेवाडी येथे शुक्रवारी पहाटे दुचाकीवरून जात असलेल्या अल्पवयीन मुलावर बिबट्याने अचानक झडप घालून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेजोमय जगदीप डोर्लेकर (वय १५, रा. गावडे–आंबेरे, ता. रत्नागिरी) असे जखमी मुलाचे नाव आहे.
तेजोमय हा त्याचा भाऊ प्रथमेश डोर्लेकर याच्यासोबत दुचाकीवर मागे बसून पुर्णगड येथे गेला होता. तेथून परत गावडे–आंबेरे येथे येत असताना बिर्जेवाडी परिसरातील चढावावर अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. या झडपेत दुचाकीवर मागे बसलेल्या तेजोमयच्या पायावर बिबट्याने पंजा मारून जखमी केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या तेजोमयला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे गावडे–आंबेरे व बिर्जेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच या घटनेची नोंद पुर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

