(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावात काही काळ शांत झालेली बिबट्याची दहशत पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. यापूर्वी गावात व परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दिवस वावर कमी झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असतानाच रविवारी घडलेल्या नव्या घटनेने पुन्हा एकदा गावकऱ्यांची झोप उडवली आहे.
डिंगणी गावातील अमोल खांबे यांच्या घराच्या पटांगणात असलेल्या पाळीव कुत्र्यावर रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक झडप घातली. मानवी वस्तीत निर्भयपणे घुसलेल्या बिबट्याने कुत्र्याला फडशा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवत तेथून पळ काढला. त्यामुळे शिकार हातची निसटल्याने बिबट्याला निराश होऊन माघार घ्यावी लागली.
हल्ल्यातून वाचलेला कुत्रा भीतीमुळे रात्रभर परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आल्यानंतर त्याच्या अंगावर गंभीर जखमा असल्याचे अमोल खांबे यांच्या लक्षात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, याच गावात काही महिन्यांपूर्वी बिबट्याने मोहल्ला परिसरात एका वासराचा फडशा पाडला होता. तसेच गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन मोहिते यांच्या दुधाळ गायीवर हल्ला करून ती ठार केली होती. त्या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी बिबट्याचा वावर कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही महिन्यांत डिंगणी व परिसरात बिबट्याचे अनेकदा दिवसा उजेडी दर्शन झाले होते. मानवी वर्दळ असलेल्या रस्त्यांवरही तो फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने बिबट्याने त्यांची शिकार केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. काही दिवस बिबट्याचा वावर कमी झाल्याने परिस्थिती निवळत असल्याचे वाटत होते.
मात्र रविवारी झालेल्या नव्या हल्ल्याने पुन्हा एकदा बिबट्याची दहशत गावावर घोंघावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. मानवी वस्तीत वारंवार शिरकाव करणाऱ्या बिबट्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

