(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील मांडवी–भुते नाका परिसरात दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितास न्यायालयाने दिलासा दिला आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कठोर अटींसह नियमित जामीन मंजूर केला आहे. अंकुश सूर्यकांत मांडवकर (२९, रा. भुते नाका, रत्नागिरी) असे जामीन मंजूर झालेल्या संशयिताचे नाव आहे.
ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. आरोपी अंकुश मांडवकर हा कोयता घेऊन भुते नाका परिसरात रस्त्यावर आला आणि दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अरमान इनामदार (२९, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीस घटनास्थळावरूनच अटक केली होती.
संशयित आरोपी गेल्या दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी व जखमी यांची पूर्वी कोणतीही ओळख किंवा वैर नव्हते. त्यामुळे खून करण्याचा ठोस उद्देश दिसून येत नाही. तपास जवळपास पूर्ण झाला असून आरोपीस अधिक काळ कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान, सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून त्याला मद्यपानाचे व्यसन आहे. जामीन मिळाल्यास तो भविष्यात गंभीर गुन्हा करू शकतो तसेच तपास सुरू असल्याने पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि तपास कागदपत्रांचा अभ्यास करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी निकाल दिला. तपास जवळजवळ पूर्ण झाल्याचे दिसते, आरोपीला घटनास्थळीच अटक करण्यात आली असून तो दीड महिन्यांहून अधिक काळ कोठडीत आहे. तसेच कथित गुन्हा मद्यप्राशनाच्या प्रभावाखाली घडल्याचे आणि आरोपी व तक्रारदार यांची कोणतीही ओळख नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या सर्व बाबी, तपासाची सद्यस्थिती आणि कोठडीत घालवलेला कालावधी लक्षात घेता आरोपीस कठोर अटींसह नियमित जामीन देणे योग्य ठरेल, असे नमूद करत न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

