(गुहागर)
तालुक्यातील तवसाळ गाव पंचक्रोशीतील तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी २ वाड्या अशा संपूर्ण भागात पारंपरिक उत्साहात शिमगोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गावच्या परंपरेला अनुसरून १२ शिमग्याचे होम करण्यात आले होते. त्यापैकी ९ होम विविध ठिकाणी पार पडले, तर ३ होम आई श्री महामाई सोनसाखळी देवीच्या चरणस्पर्शाने साजरे करण्यात आले.
दि. १३ मार्च २०२५ रोजी रात्री उशिरा गावातील देवतांना रूपे लावून पालखीत विराजमान करण्यात आले. आई श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात रात्री १२ वाजता होमाला आग लावण्यात आली आणि त्यानंतर १० वा होम प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख मानकरी श्री राजेश रमेश गडदे, तवसाळ गावचे खोत व गावकरी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मानकरी उपस्थित होते. तर कर्दै गावच्या गुरव कुटुंबाने वडिलोपार्जित सेवेतून पूजाअर्चा केली.
१४ मार्चच्या सकाळी ९ वाजता भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल झाले. पालखी मंदिराच्या सहानेवर विराजमान होती आणि परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. तवसाळ खुर्द येथे देवीच्या पालखीचा हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. यानंतर संपूर्ण गावात देवीच्या दर्शनासाठी घरोघरी फेरी काढण्यात आली. तवसाळ खुर्द पंचक्रोशीत मोठी जत्रा भरली होती, त्यानंतर देवीला जयगड खाडी येथे फेरी बोटीने नेऊन नारळ अर्पण करण्यात आला. लोकश्रुतीनुसार, देवी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी समुद्रमार्गे जात असल्याची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. परत आल्यावर ११ व्या होमाची विधीवत सांगता झाली.
महामाई सोनसाखळी साऊंड सर्विस आणि गणेश सागवेकर यांच्यातर्फे भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी विविध लोककला सादर करण्यात आल्या. तमाशा नृत्य हा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. भंडारी साज, पेहराव आणि मृदंगाचा ताल, घुंगरांच्या आवाजात रंगलेला नृत्याचा कार्यक्रम आणि गर्दीने फुललेला उत्सव यावेळी रंगला होता. यानंतर रोहीले बीच (तवसाळ आगर) येथे पालखी नाचविण्याचा विधी पार पडला. अनेक भाविकांनी होमामध्ये नारळ अर्पण केले आणि १२ व्या होमाने शिमगोत्सवाची सांगता झाली.
शिमगोत्सवानंतर पालखी तवसाळ खुर्द सहानेवर ठेवण्यात आली. ती ३० एप्रिल २०२५ (अक्षय तृतीया) पर्यंत दर्शनासाठी उपलब्ध असेल. त्यानंतर देवीच्या गावातील प्रत्येक घरात दर्शन यात्रेचा प्रारंभ होईल. या नेत्रदीपक सोहळ्याचे फोटोग्राफी प्रणय सुर्वे, हर्षद सुर्वे, दिपक जोशी, प्रितम सुर्वे तसेच सोशल मीडिया प्रसार माध्यम DJ सचिन कुळये यांनी विशेष योगदान दिले. हा सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.
हा शिमगोत्सव जातिभेदाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र आणणारा सोहळा आहे. तवसाळ पंचक्रोशीत संस्कृतीचे जतन, परंपरांचा सन्मान आणि समाजाची एकजूट यांचा सुंदर मिलाफ या उत्सवाच्या माध्यमातून भाविकांना अनुभवता आला.