(देवळे / प्रकाश चाळके)
साखरपा येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या स्वरा संतोष पांगळे हिला चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी ह्या पुरस्कारासाठी स्वरा हिची मुलाखत पार पडली होती.
चतुरंग प्रतिष्ठान तर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार देण्यात येतात. ह्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येतात. कबनूरकर स्कुलतर्फे चार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आणि फाईल प्रतिष्ठानकडे पाठवण्यात आल्या होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधून आलेल्या प्रस्तावांच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती शनिवार आणि रविवारी संस्थेच्या चिपळूण कार्यालयात पार पडल्या.
५९ शाळामधील २५४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर, डॉ मिलिंद गोखले आणि प्रा. वैभव कानिटकर यांनी परीक्षक म्हणून कामं पाहिले. ह्या मुलाखतींमधून निवड झालेल्या ३६ विद्यार्थ्यांची यादी संस्थेकडून जाहीर करण्यात आली आहे. ह्यात कबनूरकर स्कुलच्या स्वरा पांगळे हिने बाजी मारली आहे.
स्वरा हिला चित्रकलेची आवड आहे. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिवाळीत दहावीच्या निवासी अभ्यासवर्गासाठीही स्वरा हिची निवड झाली होती. तिने कराटेमध्येही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. इंग्लिश मॅरेथॉनमध्येही तिने बक्षीस मिळवले आहे.
स्वरा हिला ह्या पुरस्कारासाठी शाळेचे गणित शिक्षक अमित पंडित तसेच मुख्याध्यापिका लीना कबनुरकर यांनी तसेच अन्य शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.
स्वराच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लीना कबनूरकर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

