(रत्नागिरी)
रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या भक्कम कामगिरीचे रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी कौतुक केले. अशा टॅलेंटेड युवा क्रिकेटपटूच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत अविराज गावडेने दमदार कामगिरी करताना शेवटच्या सामन्यात नाबाद शतक ठोकले. संपूर्ण मालिकेत त्याने तब्बल सहा वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ हा किताब मिळवला. तसेच मिडलसेक्स कंट्री लीगचा ‘बेस्ट बॉलर’ हा पुरस्कारही त्याच्या नावावर जमा झाला आहे.
स्पर्धा आटोपून मायदेशी परतल्यावर अविराज गावडेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याने पालकमंत्री ना. सामंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अविराजचे मनःपूर्वक अभिनंदन केले व महाराष्ट्रातील क्रिकेटमध्ये त्याचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.

