(रत्नागिरी)
मापसा (गोवा) येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे नुकतीच गोवा ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. वर्ल्ड फुनाकोशी शोटोकान कराटे असोसिएशन यांच्या संयोजनात आणि वर्ल्ड रेनशुकान कराटेदो फेडरेशन यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देश-विदेशातून पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर, रत्नागिरी तसेच एम. डी. नाईक इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी चे दोन विद्यार्थी कुमार रेहान साबीर मजगांवकर आणि कुमार सलमान साबीर मजगांवकर यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कुमार रेहान साबीर मजगांवकर यांनी १४ वर्षाखालील गटातील “काता” या विभागात सुवर्णपदक पटकावले, तर “कुमीते” या विभागात कांस्यपदक जिंकून दुहेरी यश मिळवले. सलमान साबीर मजगांवकर या सात वर्षाखालील गटातील स्पर्धकाने काता आणि कुमीते या दोन्ही प्रकारात सुवर्णपदके मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले.
या उत्कृष्ट यशाबद्दल मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर चे संचालक आणि प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर, सौ. नौशीन मिरकर, तसेच आयान मिरकर सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला. तसेच एम. डी. नाईक इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती शाजीया अश्फाक नाईक यांनी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
रत्नागिरी जिल्ह्यात समाजसेवा आणि शैक्षणिक कार्यात अग्रणी असणारे श्री. साबीर मजगांवकर आणि श्री. शकील मजगांवकर यांनीही रेहान आणि सलमान यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फेडरेशनचे तसेच स्पर्धेचे अध्यक्ष हन्शी हसन मोहम्मद इस्माईल यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सौ. ऐमन मजगांवकर आणि मजगांवकर परिवाराच्या वतीने तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांकडून या दोन्ही विजेत्या भावंडांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

