(नवी दिल्ली)
भारत आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव मागील काही दिवसांपासून चांगलाच वाढला होता. भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लागू केले. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ट्रम्प यांनी केलेल्या सातत्यपूर्ण टीकेमुळे ही परिस्थिती अधिक ताणली गेली होती. मात्र, अलीकडच्या घडामोडींवरून हा तणाव हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, भारत आणि चीनमधील संबंधांतही सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक स्तरावर भारताने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. एप्रिल–मे २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने चिनी नागरिकांना पर्यटक व्हिसा देणे थांबवले होते. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते. आता भारतीय दूतावासांनी पुन्हा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली असून द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने ही महत्त्वाची पावले मानली जात आहेत.
भारत-चीन थेट विमानसेवा पाच वर्षांनंतर पूर्ववत
पूर्व लडाखमधील सीमावादानंतर पाच वर्षांपासून बंद असलेली भारत–चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही सेवा सुरू झाली आहे.
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू
भारत आणि चीनने कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या चीन भेटीदरम्यान एलएसीवरील लष्करी तणाव कमी करण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरु करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.
ही सर्व घडामोडी पाहता, भारताचे अमेरिकेसोबतचे तणाव कमी होताना आणि चीनसोबतचे संबंध हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहेत.

