(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व तोणदे या दोन ठिकाणी गांजासदृश अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तीन तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे नोंदविले आहेत. या दोन घटनांमुळे शहरासह ग्रामीण भागात पुन्हा एकदा अमली पदार्थांची विक्री सुरू झाल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.
गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास लांजा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, विलास जाधव, तसेच कॉन्स्टेबल सुयोग वाडकर आणि नितेश राणे गस्त घालत असताना ही घटना धुंदरे परिसरात उघडकीस आली.
पथकाने वांजुदेवी मंदिराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला दोन तरुण बसलेले दिसले. चौकशीअंती ते गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळले. या दोघांची नावे नंदादीप नामदेव वाघदरे (२९, रा. लांजा जुनी बाजारपेठ) आणि विनायक प्रकाश कुरूप (३०, रा. लांजा कुरूपवाडी) अशी आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस देवकन्या मैंदाड या पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावातही अशीच कारवाई करण्यात आली.ही कारवाई गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:२० वाजण्याच्यास सुमारास करण्यात आली. येथे साहिल भिकाजी आग्रे (२७, रा. हनुमानवाडी, तोणदे) हा तरुण गांजासदृश पदार्थाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. या प्रकरणी पोलिस हवालदार रोशन सुर्वे यांनी तक्रार दाखल केली आहे.
गेल्या वर्षभरात अमली पदार्थांच्या विक्रीवर आळा बसल्याचे सांगितले जात होते. तथापि, अलिकडच्या दोन घटनांमुळे पुन्हा ही विक्री सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने या अमली पदार्थांच्या किडीवर कठोर कारवाई करून तरुणाईचे भवितव्य सुरक्षित करावे, अशी मागणी केली जात आहे.
गांजा विकणाऱ्या एकाला अटक
रत्नागिरी ते पावस रस्त्यावर कोहिनूर हॉटेलच्या मागे विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात गांजा बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९:५० वाजण्याच्च्या सुमारास करण्यात आली. मोहम्मद कैफ मुफीद भाटकर (२५, रा. जामा मस्जिदजवळ राजीवडा, रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव आहे. सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी यांनी तक्रार दिली आहे.

