(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असून, त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चिपळूण येथे आज बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीत सावंत यांनी आपला राजीनामा सादर केला. चव्हाण हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सावंत यांनी आपल्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा केली.
राजेश सावंत यांच्या राजीनाम्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा धागा जोडला जात आहे. त्यांच्या कन्या शिवानी माने (सावंत) या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपनेते बाळ माने यांच्या सून आहेत. त्यामुळे सावंत यांच्यासमोर राजकीय तसेच कौटुंबिक संकट निर्माण झाले होते. भाजप जिल्हाध्यक्ष पदावर राहिल्यास त्यांना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणे भाग पडले असते, आणि त्यामुळे स्वतःच्या मुलीच्या विरोधात प्रचार करावा लागला असता ही स्थिती त्यांच्यासाठी नैतिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी होती. अशा गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय व कौटुंबिक संघर्ष टाळण्याचा निर्णय घेत पदाचा राजीनामा सादर केला.
सावंत यांनी आपल्या निर्णयाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहिती दिली असून, “पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आणि कौटुंबिक सौहार्द अबाधित राहावे,” या विचाराने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. संघटनात शिस्तप्रिय, कार्यतत्पर आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सावंत यांच्या राजीनाम्याने जिल्हा भाजपला संघटनात्मक धक्का बसल्याचे मानले जात आहे. आता सावंत भाजपमध्ये राहून कोणती भूमिका घेणार ते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील की कन्या शिवानी माने यांच्या प्रचाराबाबत तटस्थ भूमिका स्वीकारतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
राजेश सावंत यांचा हा राजीनामा केवळ वैयक्तिक नाही, तर तो कौटुंबिक जबाबदारी आणि पक्षनिष्ठा यांच्या सीमेवर घेतलेला संवेदनशील, नैतिक निर्णय मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

