(ठाणे)
मीरा-भाईंदर परिसरात एका शाळकरी मुलाच्या आईला अपहरणाची धमकी देत ४ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या स्कूल बस मालकास काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत या आरोपीने इतर काही पालकांनाही अशाच पद्धतीने धमकावल्याचे उघड झाले आहे.
मीरा-भाईंदर परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सोमवारी काशिमीरा पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा खुलासा केला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, तसेच तपास अधिकारी राजेश किणी, शिवाजी खाडे, राहुल सोनकांबळे, राजेंद्र सुर्यवंशी, राहुल पंडागळे, मुकेश कांबळे आणि जयप्रकाश जाधव उपस्थित होते.
२४ ऑक्टोबर रोजी काशिगावमधील सेंट जेरॉम शाळेत नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या आईला व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश आला. “तुमच्या मुलाचे अपहरण केले जाईल” असे सांगत ४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्या संदेशात मुलाचे छायाचित्रही पाठवण्यात आले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकाचा मागोवा घेतल्यावर तो एका बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले. मात्र त्याने आपला नंबर बंद झाल्याचे सांगितले. पुन्हा तक्रारदार महिलेकडून माहिती घेतल्यावर पोलिसांना संशय आला की धमकी देणाऱ्याजवळ मुलाचे फोटो फक्त शाळा बस चालकाकडे असू शकतात.
यानंतर पोलिसांनी स्कूल बस चालक सदानंद बाबुराव पत्री (वय ३७, रा. हरिराम सोसायटी, महाजनवाडी, मीरारोड) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत पत्रीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडे इको, विंगर आणि फोर्स अशा तीन लहान गाड्या आहेत, ज्याद्वारे तो सेंट जेरॉम आणि मदर मेरी शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करतो. विद्यार्थ्यांची माहिती आणि छायाचित्रे पालकांकडून तो नियमित घेत असे. याशिवाय त्याचे मोबाईल सिम, रिचार्ज व दुरुस्तीचे दुकान महामार्गावरील महाजनवाडी येथे आहे. तिथे एका बिगारी कामगाराचे सिमकार्ड गैरप्रकारे स्वतःकडे घेत त्याचा वापर करून पत्रीने पालकांना धमक्या देत खंडणी मागण्यास सुरुवात केली.
त्याने शाळकरी मुलाच्या आईकडून ४ लाख, तर इतर पालकांकडून ५ लाखांपर्यंतची मागणी केली होती. एका पालक महिलेला तर तिच्या पतीचे अपहरण केले जाईल, अशी धमकी देत तब्बल ५० लाखांची मागणी केली होती. सदर आरोपीस न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास उपनिरीक्षक राजेश किणी करत आहेत.

