(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी)
पावसाळा संपताच संगमेश्वर तालुक्यात बेकायदेशीर वाळूउद्योगाने पुन्हा डोके वर काढले असून, करजुवे–सुर्वेकोंड मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत तब्बल १६ लाख रुपये किंमतीचा डंपर वाळूसह जप्त करण्यात आला असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी तलाठी पांडुरंग कुंडलिक शेंडगे (वय ५५, रा. ओझरे खुर्द, देवरुख) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, डंपर चालक दिनार दिलीप पवार (वय ३८, रा. माखजन, मूळ रा. कोंडिवरे, संगमेश्वर) हा करजुवे ते माखजन या मार्गावरील सुर्वेकोंड परिसरात वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
तलाठी शेंडगे यांनी संशयावरून एमएच-०८ एपी-३०२९ हा डंपर थांबवला असता, त्यातून सुमारे दीड ब्रास विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. वाहनाच्या मागील बाजूस नंबरप्लेटही नसल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून वाळू वाहतूक केल्यामुळे चालक पवारविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास माखजन पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नवे जिल्हाधिकारी लक्ष देणार का?
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा संपताच सुरू होणारा बेकायदेशीर वाळूउद्योग हा स्थानिक प्रशासनासमोरील कायमस्वरूपी डोकेदुखी ठरत आहे. महसूल विभाग आणि पोलिस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अनेकदा कारवाया अर्धवट राहतात, तर काही ठिकाणी राजकीय पाठबळामुळे वाळू तस्कर अधिकच निर्भय झालेले दिसतात. नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्यात पदभार स्वीकारलेल्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी हा विषय कसोटीचा ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने जर कठोर पावले उचलली, तर अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींवर अंकुश आणता येऊ शकतो. अन्यथा महसूल खात्याचे प्रयत्न मर्यादित राहतील आणि शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणारे वाळू माफिया पुन्हा मोकाट फिरतील.

