(रत्नागिरी)
साधारण ४ वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र सुरू झाले. योगशास्त्र प्रती असलेली माझी श्रद्धा व योगवरील माझी निष्ठा यामुळे बी ए योगशास्त्रासाठी मी प्रवेश घेतला. मात्र या संस्कृत उपकेंद्राच्या माध्यमातून तीन वर्षात मला योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळाले, असे गौरवोद्गार बी ए योगशास्त्रात विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक विजेते विनय साने यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, योगशास्त्र विषय हा आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे याचे अध्ययन करणे गरजेचे आहे.
दरम्यान रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे बी ए योगशास्त्राचे विद्यार्थी विनय साने यांनी प्रथम प्रयत्नात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागपूरमधील रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय परिसरात दीक्षांत समारंभ दि १६ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. यावेळी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते व भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष व भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे श्री चमूकृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बी ए योगशास्त्राचे पदवी प्रमाणपत्र व सुवर्णपदक विनय साने यांना प्रदान करण्यात आले. त्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांना दोन विशेष पारितोषिके मिळाली ज्यात स्व. श्रीमती सामरबाई करमशी जेठाभाई सोमय्या स्मृती सुवर्णपदक आणि गंगाधर घाटोळे यांनी प्रदान केलेले स्व. श्री नारायण जयराम घाटोळे स्मृती रोख पारितोषिक यांचा समावेश आहे.
विनय साने यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल दि २८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे उपकेंद्राच्या स्थापनेबाबत आभार मानले. तसेच रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांचे देखील आभार मानले. तसेच विद्यापीठ उपकेंद्र आणि मार्गदर्शक प्राध्यापकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी उद्बोधन पर श्री साने यांचे अभिनंदन केले. यावेळी विनय साने यांनी कालपरत्वे वाढणारी योगशास्त्राची उपयोगिता यावर प्रकाश टाकला. यावेळी विनय साने यांना विषय मार्गदर्शन करणारे प्रा कश्मिरा दळी, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा अक्षय माळी आणि उपकेंद्रातील कर्मचारी वर्ग व बी ए आणि एम ए योगशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित होते.