(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे मधलीवाडी येथे ग्रामदेवता मंदिरात श्री चंडिका देवी व ग्रामदेवतांची मूर्ती स्थापना निमित्त शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर ते सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चाफे मधलीवाडी येथील जय चंडिका मित्र मंडळ, जय चंडिका महिला मंडळ आणि जय चंडिका क्रिकेट संघ यांचे संयुक्त विद्यमाने श्री चंडिका देवी प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी श्री चंडिका देवीच्या मूर्तीचे आगमन व मिरवणूक, रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी देव देवतांचे चालन विधी व होमहवन/ स्थिर प्रतिष्ठापना विधी, सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी होमहवन व देवतांची स्थापना, दुपारी बारा वाजता महाआरती, दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी तीन वाजता हळदीकुंकू, सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजता माहेरवाशीणचे मानपान, सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री दहा वाजता खास करमणुकीचा कार्यक्रम म्हणून सर्वत्र लोकप्रिय असलेला “संगमेश्वरी साज, संगमेश्वरी बाज” सादर होणार आहे.
चाफे परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी देवीचे आगमन तसेच प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सहकुटुंब, मित्रमंडळींसह उपस्थित राहावे असे आवाहन चाफे मधलीवाडी येथील जय चंडिका मित्रमंडळ, जय चंडिका महिला मंडळ, जय चंडिका क्रिकेट संघ यांचेवतीने करण्यात आले आहे.

