(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे विधान परिषदेतील पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. आगामी वर्षी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपने शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात शरद लाड यांनी पक्षप्रवेश केला. या वेळी त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आणि पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला.
शरद लाड हे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर राजकारणातही नवीन समीकरणे घडू शकतात, असा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर नेत्यांनी नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत आगामी निवडणुकांमध्ये एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

