(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अक्षरशः जीवावर बेतणारा ठरत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागावी, इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. चालकांचा जीव धोक्यात असतोच, पण प्रवाशांना देखील प्राण मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
वातानुकूलित शासकीय कार्यालयात बसून कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना या समस्येचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने सामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. “मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच सबंधित विभाग खड्डे भरण्याची तसदी घेणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
विद्यार्थी आणि सामान्य जनतेची प्रचंड कसरत
देवरुख हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने तहसील, पंचायत समिती आदी शासकीय कामांसाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. शिवाय संगमेश्वरपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर लोवले येथे नवनिर्माण ज्युनिअर आणि सीनिअर कॉलेज, पुढे बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय तसेच देवरुख येथील शाळा-काॅलेजसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ने-आण सुरू असते. त्यामुळे शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थ या सर्वांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. एका खड्ड्याला चुकवलं तरी दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाण्याची शंभर टक्के शक्यता असते, इतकी बिकट परिस्थिती या मार्गावर निर्माण झाली आहे.
रुग्णांचे हाल–गरोदर महिलांची वेदना
या मार्गावरून बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र, संगमेश्वर-देवरुख ग्रामीण रुग्णालये तसेच खासगी दवाखान्यांत रुग्णांना नेणे म्हणजे रुग्णांच्या हालात अधिकच भर पडणे होय. बसणाऱ्या सततच्या हादऱ्यांमुळे रुग्णांची वेदना वाढते. इतकेच नव्हे तर दर महिन्याला तपासणीसाठी जाणाऱ्या गरोदर महिलांनाही या मार्गावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. “उपचार झाले नाही तरी चालतील, पण खड्ड्यांचे जीवघेणे हादरे नकोत” अशी हतबल भावना रुग्णजनतेतून व्यक्त होत आहे.
“आमदार साहेब, एकदा तरी एसटी बसने प्रवास करा”
काही दिवसांपूर्वी झालेल्या संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेत एका जागरूक नागरिकाने आमदार शेखर निकम यांच्यासमोर या रस्त्याची कैफियत मांडली. “एसटी बसने प्रवास करताना या खड्ड्यांतून किती जीवघेणे हादरे बसतात हे हायफाय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना जाणवत नाही. साहेब, तुम्ही एकदा तरी एसटी बसने प्रवास करून पाहा म्हणजे जनतेची खरी परिस्थिती समजेल,” असे स्पष्ट शब्दांत सु सुनावले.
दुचाकी अपघातांची मालिका सुरू
खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघातांना बळी पडले आहेत. राज्यात व जिल्ह्यात यापूर्वी खड्ड्यांमुळे मृत्यूच्या घटनाही घडल्या असून काहींना कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागले आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडण्याआधीच संबंधित विभागाने केवळ नावापुरती मलमपट्टी न करता दर्जेदार पद्धतीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

