(संगमेश्वर)
तालुक्यातील तुरळ येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा हाच संकल्प, भारत हीच पहिली प्रेरणा’ या विशेष उपक्रमाअंतर्गत तुरळ ग्रामपंचायतीत महिला आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महिलांच्या आरोग्य, पोषण व उपचार सेवांवर विशेष भर देण्यात येत आहे.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय (अॅनिमिया) तसेच स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणीसह विविध निदान चाचण्या करण्यात आल्या. गर्भवती व स्तनदा मातांसाठी पोषण सल्ला, आहार मार्गदर्शन, आयर्न-फोलिक आम्ल गोळ्यांचे वितरण तसेच आवश्यक लसीकरणाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली.
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत महिलांची तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून “सशक्त नारी म्हणजे सशक्त कुटुंब” हा संदेश देत महिलांच्या आरोग्यजाणीवेत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न होत आहे.
या शिबिराला तुरळ ग्रामपंचायचे सरपंच सहदेवजी विठ्ठल सुवरे, ग्रामसेवक विशाल भुयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रातील हेमंत रेवाळे, सिस्टर घाग (सुपरवायझर), श्रीमती पुरोहित, श्रीमती लिंगायत (अशा सुपरवायझर), गुट्टे व मस्के (सीएचओ), व्हावहाटे व जोनवाळ (आरोग्य सेवक) यांच्यासह चालक कदम उपस्थित होते. शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रमेशजी डिके (क्राईम रिपोर्टर), संतोष जाधव (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), तुकाराम येलोंडे व कृष्णा नाडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उपक्रमाला हातभार लावला.

