(रत्नागिरी)
पतसंस्थेच्या स्थापनेपासूनच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित महिलांना मार्गदर्शन व आर्थिक साह्य करून त्यांची समाजात पत निर्माण करण्याचे काम जिल्हा महिला पतसंस्थेने केले आहे. आजही अनेक कर्जदार कर्ज परतफेड करून नव्याने कर्ज घेऊन आपल्या व्यवसायात भरारी घेत आहेत, मुलांना उच्च शिक्षित करत आहेत, त्यामुळेच ही संस्था सर्वसामान्यांची हक्काची संस्था आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष युगंधरा प्रकाश राजेशिर्के यांनी केले. पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये त्या बोलत होत्या.
वार्षिक सभेला संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता तांबे, संचालिका विनया बेलवलकर, संचालिका प्राची शिंदे व दिलनाझ शेख, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे, रत्नागिरी शाखेच्या व्यवस्थापिका आदिती पेजे मंचावर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्राची शिंदे यांनी केले.
संस्थेचा आदर्श शाखा पुरस्कार या वर्षी लांजा शाखेला अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के व संचालिकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पतसंस्थेचे जनक कै. गोविंदराव निकम यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या महिला पतसंस्थेला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र मिळवून दिले. पै. एम. डी. नाईक, कै. कुमार शेट्ये, विजयराव सावंत व राजाभाऊ लिमये यांनी संस्थेला सुरवातीपासून सहकार्य केले. तसेच संस्थेला सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन यांचेही मार्गदर्शन लाभत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट, आरडी एजंट, तसेच सर्व संचालकांच्या मेहनतीमुळे संस्था चांगले काम करत असल्याबद्दल अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के यांनी सर्वांचे आभार मानले.
संस्थापक गोविंदराव निकम व सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने सभेला सुरवात झाली. त्यानंतर वर्षभरात निधन पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन प्राची शिंदे यांनी केले.
कर्मचारी, पिग्मी एजंटच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत पियुष रेपाळ, सेजल मोहिते, भक्ती कदम, जिज्ञेश शिंदे, श्रावणी सकपाळ व सोनम ताम्हनकर, इयत्ता बारावीतील गुणवंत सानिया मोहिते, मैत्रेयी जाधव, अथर्व पोकळे, रिद्दिश रसाळ, शुभम ताम्हनकर, तसेच पियुष नेरकर (बीएएमएस), राहुल किंजळे (बी. ई.), समिधन मोरे (बी. टेक.), शुभम शिवलकर (मर्चंट नेव्ही) आणि श्रावणी चिंदे (बी. टेक) यांना सन्मानित करण्यात आले.

