(रत्नागिरी)
मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थिनी तन्वी सावंत हिने दुहेरी यश संपादन केले आहे. तिने हिंदी एकांकिकेत उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले, तर मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.
मराठी एकपात्री स्पर्धेसाठी तन्वीने ‘सखाराम बाईंडर’ या विजय तेंडुलकर लिखित नाटकावर आधारित आगळीवेगळी संकल्पना साकारली. त्या काळात समाजाला न पटलेले आणि प्रेक्षकांनी प्रचंड विरोध केलेले हे नाटक स्त्री-पुरुष संबंधांवर आणि घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. तन्वीने या नाटकातील ‘चंपा’ या स्त्री पात्राची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर उभी केली. तिचा निडर स्वभाव, चौकटीबाहेरची विचारसरणी आणि सामाजिक वास्तवाशी भिडणारे व्यक्तिमत्त्व यांचे प्रभावी सादरीकरण करून तिने परीक्षकांचे मन जिंकले.
या अभिनयाचे पुनर्लेखन व दिग्दर्शन वेदांग सौंदलगेकर यांनी केले असून विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.
तन्वीच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साकळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.

