(कल्याण)
शहरातील शीळ रोडवरील खड्ड्यामुळे घडलेल्या अपघातात एका शिवसैनिकाच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहन शिंगरे (वय 28) असे या तरुणाचे नाव असून, या घटनेने शिंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन शिंगरे हे कल्याणच्या रामबाग परिसरात राहत होते आणि कामानिमित्त वाशी येथे जात होते. 23 जुलै रोजी, ते गॅलेक्सी फर्निचर ते पिंपळेश्वर हॉटेल दरम्यान दुचाकीवरून प्रवास करत असताना, रस्त्यावरील खड्ड्यात गाडी आदळली आणि त्यांचा तोल गेला. ते खाली पडले आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचा हात आल्याने ते फरफटत गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती.
अपघातानंतर रोहन यांना तातडीने मानपाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सानपाडा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तब्बल 21 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, 15 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रोहन हे ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचे एकुलते पुत्र होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी होणाऱ्या अपघातांवर प्रशासन कधी जागं होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

