(पुणे)
‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेला आणि ‘पिट्या भाई’ म्हणून लोकप्रिय झालेले अभिनेते रमेश परदेशी यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान झालेल्या पदाधिकारी बैठकीत वातावरण चांगलेच तापले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसून आले.
बैठकीत त्यांनी थेट सवाल केला— “इतके दिवस काय काम केले? मतदार याद्या पूर्ण का झालेल्या नाहीत?” कामात उदासीनता दाखवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “काम करायचे नसेल तर तातडीने पद सोडा.” मतदार याद्यांचे काम पूर्ण करूनच पुढील बैठकींना उपस्थित राहा, असेही त्यांनी निर्देश दिले होते.
याच दरम्यान, ‘पिट्या भाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर “मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम” असे कॅप्शन देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो शेअर केला होता. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चां होत्या. अखेर काहीच दिवसांत या चर्चा खऱ्या ठरून त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला.
संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी यांना कार्यकर्त्यांच्या समोरच झापलं होत. “छाती ठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाईमपास करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा..” असे म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले होते. यानंतर या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः रमेश परदेशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. परदेशी यांनी या वृत्तांचे खंडन करत, “असं काहीच घडलं नाही,” असे म्हटले होते. तरीसुद्धा, त्यांनी मनसेतून बाहेर पडत भाजपाचा हात धरण्याचा निर्णय घेतल्यामुळे या राजकीय चर्चांची रंगत वाढली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले रमेश परदेशी थेट राज ठाकरेंसोबतच्या कार्यक्रमांना देखील उपस्थित राहत होते. परंतु आता त्यांनी मनसेला रामराम देत भाजपात प्रवेश केला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरत आहे.

