(रत्नागिरी)
केकचे दुकान चालविण्यासाठी घेतलेल्या तरुणाने दुकानाशेजारीच असणाऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी शहरातील मारुती मंदिर परिसरातील नवकार प्लाझा येथे उघडकीला आला. त्याने अलिकडेच हे दुकान चालविण्यासाठी घेतले होते.
प्रदीप धर्माप्पा बल्याणअली (३४, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. नवकार प्लाझा, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या दुकानातील कर्मचारी दिवेश श्रीपत मांडवकर याने शहर पोलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, सोमवारी सकाळी तो दुकानातील साफसफाईचे काम करण्यासाठी आला होता, परंतु त्याला प्रदीप बल्याणअली कोठेही दिसले नाहीत.
त्याने त्याच्या मोबाइलवर फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे दिवेशने दुकानाच्या बाजूलाच ते राहत असलेल्या खोलीच्या खिडकीतून आतमध्ये पाहिले. त्यावेळी प्रदीप बल्याणअली यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्याने लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.