(संगमेश्वर)
तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे बुधवारी सकाळी एका २१ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सोहम राजाराम पवार असे या तरुणाचे नाव असून, तो सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराधीन आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोहम याच्या प्रेयसीने गेल्या काही दिवसांपासून त्याच्याशी संवाद तोडला होता. तिच्या या वागणुकीमुळे नैराश्यग्रस्त झालेल्या सोहमने बुधवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता घातक पदार्थ प्राशन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विष सेवनानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने तातडीने त्याला देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची नोंद देवरूख पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.