(कणकवली)
दिल्लीतील साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही, या चर्चासत्रात विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे विधान केले होते. त्यांच्या विधानाचा शिवसेना उबाठा पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. शिवसेनेत गुणवत्तेच्या जोरावर पदे मिळतात, त्यामुळे गोऱ्हे यांनी यापुढील काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यास, त्यांना ठाकरेंच्या रणरागिणी महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा महिला आघाडीच्या प्रमुख नीलम सावंत यांनी दिला आहे. तसेच गोऱ्हे यांना महिला आघाडीतर्फे खेळण्यातील मर्सिडीज पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सौ. सावंत बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख माधवी दळवी, महिला पदाधिकारी वैद्यही गुडेकर, संजना कोलते, प्रतीक्षा साटम, प्रतिभा अवसरे उपस्थित होत्या.
सावंत म्हणाल्या, १४७ वर्षांची मराठी साहित्य संमेलनाला परंपरा आहे. दिल्लीत झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनात असे आम्ही घडलो या चर्चात्रसात शिवसेनेत्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे विधान केले होते. त्यांचे हे विधान मुर्खपणाचे व निच्च आहे. त्यांच्या या विधानाचा सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय व हक्कांसाठी शिवसेना संघटना स्थापन केली. बाळासाहेबांनी गुणवत्ता असलेल्या शिवसैनिकांना पक्षातील पदे आणि संविधानिक पदे दिली. गोऱ्हे यांना पक्षाने चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली. शिवसेनेमुळे गोऱ्हे यांना देशात व राज्यात ओळख मिळाली. त्याचा आता त्यांना विसर पडला असून राजकीय लोचटगिरीसाठी त्या ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेल्या आहेत, अशी टीका सावंत यांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, गोऱ्हे यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवून आतापर्यंत किती मर्सिडीज दिल्या यांचे पुरावे दाखवावे, असे आव्हान सावंत यांनी दिले. गोऱ्हे या शिवसेनेत असताना आम्ही त्यांच्याकडे काही विषय मांडले होते. मात्र, त्यांनी त्याकडे अक्षम्यपणे दुर्लक्ष केले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.