(मुंबई)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली असून, मतदारसंख्या, मतदान केंद्रांची उपलब्धता, ईव्हीएम आणि मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकांचे नियोजन केले जात आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे समाविष्ट केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आवश्यक तयारी तातडीने सुरू करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. या संदर्भात गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, तसेच आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मतदार यादी आणि मतदान केंद्रांची आखणी
निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेली मतदार यादीच वापरण्यात येते. या संदर्भात आयोगाशी प्राथमिक चर्चाही झाली आहे. या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याने, विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा मतदान केंद्रांची संख्या अधिक असणार आहे. मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने यासाठी स्वतंत्र आदेशाद्वारे स्पष्ट निकष ठरवले आहेत.
सर्व मतदारांसाठी सुविधा; दिव्यांगांसाठी विशेष लक्ष
वाघमारे यांनी निर्देश दिले की, सर्वसामान्य मतदारांसह दिव्यांग मतदारांच्या गरजा लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. तसेच, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता व कार्यस्थितीचा अचूक आढावा घेऊन, आवश्यक असल्यास नव्या यंत्रांची पूर्तता करण्यात यावी. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी म्हणाले की, “ईव्हीएम यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी तातडीने सुरू करून ती निवडणुकीसाठी सज्ज ठेवावीत. यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना वेळीच राबवाव्यात.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, मतदान केंद्रांची जागा, इमारतींची स्थिती, आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचा आढावा घेऊन वेळेत तयारी करण्यात यावी. मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेणे आणि गरजेनुसार संबंधित विभागीय आयुक्तांशी समन्वय साधून मनुष्यबळाची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित आणि नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार काम करत, मतदारांचा विश्वास जपणाऱ्या पारदर्शक आणि सुरळीत निवडणुका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.