( रत्नागिरी /प्रतिनिधी )
गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादीस वेळोवेळी तपासाची माहिती मिळावी, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवता याव्यात, यासाठी ‘मिशन प्रगती’ व ‘मिशन प्रतिसाद’ या दोन उपक्रमांची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक बगाटे म्हणाले, “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९३ (३)(२) नुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित फिर्यादीस गुन्ह्याच्या तपासाची माहिती देणे अनिवार्य आहे. त्याअंतर्गत आता पंचनामा, अटक व अन्य महत्त्वाच्या घडामोडींची माहिती फिर्यादीस मेसेज किंवा व्हॉट्सॲपद्वारे मिळणार आहे. ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध नाही, अशा नागरिकांना पोस्टाद्वारे माहिती पोहोचवली जाईल.” रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांमध्ये अनेकदा दुर्गम भागातील नागरिकांना तपासाबाबत माहिती मिळवण्यासाठी थेट पोलिस ठाण्यात यावे लागते. हा त्रास कमी व्हावा आणि नागरिकांशी अधिक सुसंवाद साधता यावा, यासाठी ‘मिशन प्रगती’ उपक्रम राबवण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांच्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘मिशन प्रतिसाद’ ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. पूर्वी स्थापन करण्यात आलेल्या सहाय्यता कक्षांचे काम यशस्वी ठरण्यात मर्यादा असल्याचे बगाटे यांनी मान्य करत, “आता २४ तास कार्यरत राहणारे दोन हेल्पलाईन क्रमांक – ९६८४७०८३१६ आणि ८३९०९२९१०० सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे,” असे सांगितले.
वैद्यकीय मदत, कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, आर्थिक शोषण अशा कोणत्याही अडचणीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी मिळताच पोलीस कर्मचारी थेट त्यांच्या घरी जाऊन मदत करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. संबंधित समस्येवर कशी मदत केली गेली, याचा फोटोसह अहवाल तयार करून त्याचा पूर्ण पाठपुरावा केला जाणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे थेट मॉनिटरिंग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून होणार आहे.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्री संकल्पनेतील १०० दिवस कार्यक्रमानंतरच्या ‘१५० दिवस कार्यक्रमाची’ माहिती दिली. “ई-प्रशासन सुधारणा उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर १७ प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. मात्र नागरिकांना याची माहिती कमी असल्याने ते आजही पोलीस ठाण्यांमध्ये हेलपाटे मारत आहेत,” असे सांगत याबाबत सर्व शासकीय व खासगी आस्थापनांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी नागरिकांची होणारी धावपळ लक्षात घेता, सर्व आस्थापनांनी संबंधित वेबसाईटवर अर्ज करावा आणि त्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला QR कोड वापरावा, असे आवाहन करण्यात आले. ऑनलाईन अर्जांची पडताळणी मात्र तीन दिवसांत पूर्ण केली जाते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर निश्चित करण्यात आले आहेत. हे सर्व नंबर ‘सिमकार्ड बेस लँडलाइन’ स्वरूपात कार्यरत असून, नागरिक थेट संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधू शकतील. तपास, तक्रारी, किंवा अन्य पोलिसी कामकाजासाठी या क्रमांकांचा उपयोग केला जाऊ शकतो. पोलीस हे केवळ कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा नसून समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेली बांधील संस्था आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या दोन्ही उपक्रमांद्वारे करण्यात येत आहे, असे सांगत अधीक्षक बगाटे यांनी पुढील काळात आणखी नागरिकाभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे नवे मोबाईल क्रमांक जाहीर
1. SP Sir – 9684708301
2. ADDL. SP Madam – 9684708302
3. SDPO Ratnagiri – 9684708303
4. SDPO Lanja – 9684708304
5. SDPO Chiplun – 9684708305
6. SDPO Khed – 9684708306
7. Dapoli Police Station – 9684708307
8. Khed Police Station – 9684708308
9. Guhagar Police Station – 9684708309
10. Chiplun Police Station – 9684708310
11. Rajapur Police Station – 9684708311
12. Mandangad Police Station – 9684708312
13. Lanja Police Station – 9684708313
14. Devrukh Police Station – 9684708314
15. Ratnagiri Gramin Police Station – 9684708315
16. Sangameshwar Police Station – 9684708317
17. Alore Shirgaon Police Station – 9684708318
18. Sawarde Police Station – 9684708319
19. Bankot Police Station – 9684708320
20. Jaigad Police Station – 9684708321
21. Nate Police Station – 9684708322
22. Purnagad Police Station – 9684708323
23. Dabhol Police Station – 9684708324
24. Senior Citizen Helpline (प्रतिसाद) – 9684708316 / 8390929100