(सांगली / वृत्तसंस्था)
प्रेमसंबंधातील संशय आणि वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याच्या रागातून एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात घडली आहे. कंठी गावाजवळील मोटेवाडी येथील खरात वस्तीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर (वय ३०, रा. कंठी) याच्यासह त्याच्या साथीदाराला जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजाक्का यांचे माहेर जत तालुक्यातील बागेवाडी येथील असून, आठ वर्षांपूर्वी त्यांचा कंठी येथील काशीराम खरात यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचे आई-वडीलही कंठी येथेच राहतात. उच्चशिक्षित असलेल्या राजाक्का पुण्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करत होत्या. त्याचबरोबर त्या खासगी क्लासेसही घेत होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या सुमारे दहा दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, राजाक्का आणि कंठी येथील मनोज कोळेकर यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, राजाक्का यांनी पुण्यात नोकरीसाठी राहण्याच्या निर्णयाला मनोजचा विरोध होता. त्यातच राजाक्का यांचे अन्य कोणाशी तरी जवळचे संबंध असल्याचा संशय मनोजला होता. यावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी मनोजने राजाक्का यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. भेटण्यासही नकार दिल्याने संतप्त झालेला मनोज थेट खरात वस्तीवरील त्यांच्या घरी पोहोचला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास घरासमोर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मनोजने धारदार शस्त्राने राजाक्का यांच्या पोटावर आणि शरीराच्या अन्य भागांवर वार केले. यातील एक वार हृदयाजवळ वर्मी लागल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच कोसळल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार राजाक्का यांच्या आईसमोर घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या वेळी मनोज कोळेकर आणि त्याचा साथीदार दारूच्या नशेत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. राजाक्का आपल्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधत असल्याच्या संशयातून तसेच भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून मनोजने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेच्या हत्येची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून मुख्य संशयित मनोज कोळेकर आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेतला. हत्या केल्यानंतर दोघेही जवळच असलेल्या उसाच्या फडात जाऊन लपल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोघांनाही ताब्यात घेतले. मनोजने खुनाची कबुली दिल्याची माहितीही समोर आली आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हलवत संशयितांना ताब्यात घेतले. सध्या जत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


