(संगमेश्वर / एजाज पटेल)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या देवरूख आगाराचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. देवरूख-साखरपा-लांजा मार्गावरील एसटी बससेवा अनियमित असल्याने सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अधिकृत थांब्यावर प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबवता पुढे निघून गेल्याचा प्रकार आज (२७ ऑगस्ट) रोजी सकाळी घडला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित प्राध्यापिकेने देवरूख आगाराच्या तक्रार पुस्तकात लेखी तक्रार नोंदवली आहे.
२७ ऑगस्ट रोजी देवरूख येथून सुटणारी देवरूख-साखरपा-लांजा बस तब्बल ५० मिनिटे उशिराने, सकाळी सुमारे ८.५० वाजता पंचायत समिती थांब्यावर पोहोचली. या फेरीवर अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि इतर प्रवासी अवलंबून होते. साखरपा येथील महाविद्यालयात लेक्चरसाठी जाणाऱ्या प्राध्यापिकेसह अन्य प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. बस येताच प्रवाशांनी हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस न थांबवता चालकाने ती पुढे नेल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
या प्रकाराबाबत संबंधित प्राध्यापिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली. दररोज वेळेवर महाविद्यालयात पोहोचून विद्यार्थ्यांना शिकवणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या असताना प्रत्येक लेक्चर महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत ५० मिनिटे उशिराने आलेली बस अधिकृत थांब्यावर हात दाखवूनही न थांबवता पुढे जाणे हा अत्यंत त्रासदायक प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सेवा देण्यासाठी विविध योजना आणि जाहिराती केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात अधिकृत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना बसमध्ये न घेता बस पुढे नेली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बससेवा अनियमित असताना उपलब्ध फेऱ्यांचे योग्य नियोजन आणि प्रवाशांच्या गरजेनुसार संचालन करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
एका बाजूला प्रवाशांची संख्या कमी होत असल्याचे कारण देत एसटीच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाते, तर दुसरीकडे उपलब्ध बस अधिकृत थांब्यावर थांबत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा प्रकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटीवरील प्रवाशांचा विश्वास कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावरही होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
या घटनेची लेखी तक्रार देवरूख आगाराच्या तक्रार पुस्तकात नोंदवण्यात आली आहे. आता या तक्रारीची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाते का, संबंधित बसचालकाकडून प्रवाशांना न थांबवण्याचे कारण स्पष्ट केले जाते का आणि देवरूख-साखरपा-लांजा मार्गावरील फेऱ्यांचे वेळापत्रक नियमित केले जाते का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
देवरूख आगाराने या मार्गावरील बसफेऱ्या वेळेत चालवाव्यात, अधिकृत थांब्यांवर बस थांबवण्याबाबत चालक-वाहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

