(नवी दिल्ली)
NEET UG/PG परीक्षा देणारे आणि सध्या MBBS शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) च्या नव्या नियमांनुसार, एखाद्या विद्यार्थ्याची माहिती कॉलेज पोर्टलवर अपलोड झाली नसेल, तर त्या विद्यार्थ्याला डॉक्टर म्हणून नोंदणी करता येणार नाही. यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतरही कॉलेजच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे NMC ने विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणीस्थिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या पोर्टलवर पडताळण्याचा सल्ला दिला आहे.
अजूनही हजारो विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड नाही
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात देशभरात सुमारे १.१८ लाख MBBS जागा उपलब्ध होत्या. मात्र, त्यातील केवळ १.१५ लाख विद्यार्थ्यांची माहितीच NMC च्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. याचा अर्थ सुमारे ३,००० विद्यार्थ्यांची माहिती अद्याप अपूर्ण किंवा गहाळ आहे. NMC च्या सूचनेनुसार, काही महाविद्यालयांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्याप पोर्टलवर नोंदवलेली नाही किंवा काही कॉलेजांनी अपूर्ण माहिती (जसे नाव, रोल नंबर, गुणवत्ता क्रमांक, जन्मतारीख, प्रवेश दिनांक) अपलोड केली आहे.
नोंदणीस अपात्र ठरण्याचा धोका
NMC ने स्पष्ट केले आहे की, फक्त NMC पोर्टलवर माहिती अपलोड झालेल्या विद्यार्थ्यांनाच भारतात अॅलोपॅथी/मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास करण्यासाठी नोंदणी करता येईल. काही संस्थांनी पात्रता नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्याचेही आढळून आले असून, हे NMC च्या नियमानुषंगाने नियमभंगाचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून नोंदणी नाकारली जाऊ शकते.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
सर्व MBBS विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क करून, त्यांची नोंदणी NMC पोर्टलवर झाली आहे का, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, अभ्यासक्रम पूर्ण करूनही डॉक्टर म्हणून करिअर सुरू करण्यास अडथळा येऊ शकतो. नोंदणीप्रक्रियेत झालेल्या त्रुटी किंवा विलंबाबाबत कोणतीही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा किंवा NMC कडे थेट तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.