( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने इ. ६वी मध्ये शिकणाऱ्या कु. आयुष हेमंत चव्हाण याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील विविध स्पर्धा व परीक्षातील यशांसाठी त्याला एका छोटेखानी समारंभात सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, डॉ. चंद्रशेखर केदारी, ॲड. वेदा प्रभुदेसाई, नितीन शेडगे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर आणि दीक्षा खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत आयोजित ४४ व्या होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यावर्षी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून सुमारे ८८,८०० विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी कोल्हापूर विभागातून सुमारे ५,००० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामधून ३७१ विद्यार्थी कोल्हापूर येथे झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी, तर त्यातील केवळ ४२ विद्यार्थी कृतिसंशोधानासाठी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले. यामधून फक्त ५ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेसाठी आयुषने स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थांपासून खत निर्मिती करून त्याचा व्हर्टीकल गार्डन (उभ्या बागेच्या) माध्यमातून भाज्यांच्या शाश्वत उत्पादनासाठी कशा प्रकारे वापर करता येईल, यावर संशोधन केले. शहरांमध्ये वाढणारी लोकसंख्या, तिच्या अन्नाच्या वाढत्या आणि बदलत्या गरजा, पारंपरिक शेतीमधून पुरवल्या जाणाऱ्या शेतमालाच्या वाहतुकीच्या आणि ताजेपणाच्या समस्या, शहरात काही ठिकाणी गलिच्छ परिस्थितीत पिकवलेली निकृष्ट कृषी उत्पादने अशा अनेक प्रश्नांना उत्तर म्हणून या संशोधनाचा उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर याचा वापर करून कमी खर्चात आणि कमी जागेत आरोग्यदायी कृषी उत्पादन व उत्पन्न मिळवण्याचा नाविन्यपूर्ण मार्ग या संशोधनाद्वारे कृतीत आणण्याचा उद्देश आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आयुषने ५वी स्कॉलरशिप परिक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून तृतीय व संगमेश्वर तालुक्यातुन प्रथम क्रमांक, विज्ञानरंजन परिक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक, मंथन परिक्षेतही कोंकण विभागातुन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर बी.डी.एस. परिक्षेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. आयुषची इ. ६वी करीता नवोदय विद्यालयासाठी निवड झाली होती. पाध्ये प्रशालेकडून प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर अवॉर्ड’ आयुषने इ. १ली ते इ. ६वी असा सतत सहा वर्ष प्राप्त केला आहे. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी आयुषला भेटवस्तू देऊन सन्मानित केले. संस्थाध्यक्ष श्री. भागवत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर आयुषने मनोगत व्यक्त केले.
आयुष याच्या दैदीप्यमान कामगिरीत त्याची आई गोकर्णा हेमंत चव्हाण आणि आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयात कार्यरत असणारे त्याचे वडील प्रा. डॉ. हेमंत चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशालेतून वर्गशिक्षिका योगिनी केतकर, विज्ञान शिक्षिका मेघा संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. होमी भाभा स्पर्धेतील कृती संशोधनाचा अवघड टप्पा पार करण्यासाठी डॉ. प्रताप नाईकवाडे, डॉ. सागर संकपाळ, डॉ. रणजीत बनसोडे, डॉ. मीरा काळे, राहुल शिंदे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. आयुष याच्या यशाचे प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो : आयुष याच्या सत्काराप्रसंगी उपस्थित शेडगे, प्रा. डॉ. चव्हाण, सौ. चव्हाण, संस्थाध्यक्ष भागवत, डॉ. केदारी, ॲड. सौ. प्रभूदेसाई, मुख्याध्यापिका सौ. खंडागळे व सौ. नारकर.