(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे वीरशैव लिंगायत समाज मित्रमंडळाच्या वतीने २८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय लिंगायत समाज मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे पर्व असून, मालगुंड येथील ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिराशेजारील राणे क्रीडांगणावर कबड्डीचा थरार रंगणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मंडळाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना दर्जेदार क्रीडांगण आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. जोश, जिद्द, ताकद आणि चुरशीच्या सामन्यांमुळे या स्पर्धेत कबड्डीप्रेमींना खेळाचा रोमांच अनुभवता येणार आहे.
जिल्हास्तरीय या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रमुख आयोजक विनेश लिंगायत, उमेश लिंगायत, रितेश लिंगायत, आनंद लिंगायत आणि आदित्य लिंगायत यांच्याशी संपर्क साधावा, असेही मंडळाने कळविले आहे.


