( रत्नागिरी / वार्ताहर )
शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नाचणकर चाळ परिसरात कारवाई करत गांजाची विक्री करण्यासाठी आणल्याच्या आरोपावरून २४ वर्षीय तरुणाला अटक केली. सूरज परशुराम नंदिवले (वय २४, सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी; मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून १ किलो २०१ ग्रॅम गांजासह एकूण ६० हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना नाचणकर चाळ येथे सूरज नंदिवले आढळून आला. तो एनडीपीएस कायद्यानुसार यापूर्वीच्या नोंदीतील आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्याकडील गांजा विक्रीसाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक विवेक पाटील, पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर तसेच कॉन्स्टेबल अमित पालवे आणि नीलेश शिंगवे या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.


