( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील नाणीज येथे गुरुवारी (दि. ८ मे) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. चालत्या वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार दुभाजकावर आदळली आणि एकच गोंधळ उडाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिकुळ (ता. दोडामार्ग) येथील गवस कुटुंब गुरुवारी सकाळी एमएच-०७-एजी-७५९८ या खासगी वाहनाने संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गुरववाडी येथे लग्नसमारंभासाठी आले होते. समारंभानंतर सायंकाळी ते कोल्हापूर मार्गे आपल्या गावी परतत असताना, नाणीजजवळ त्यांच्या गाडीचा पुढील टायर अचानक फुटला. टायर फुटल्यामुळे वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट दुभाजकावर आदळली.
या अपघातात वाहनचालक नीलेश गवस (वय ३६) यांच्या डोक्याला उजव्या बाजूने गंभीर मार लागला आहे. त्यांच्या वडिलांना डोक्याला व पायाच्या अंगठ्याला, आई गितांजली गवस यांच्या पायाला व तोंडाला, पत्नी नेहा गवस हिला डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून लहान मुलगी सुकन्या गवस हिलाही मुका मार बसला आहे.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

