(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील सर्व बौध्द समाजाकडून राज्यात घडलेल्या तीन घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दिनांक १६ जानेवारी २०२५ ) देवरूख बाजारपेठेतून भव्य जनआक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला. या भव्य दिव्य निघालेल्या मोर्चात तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्तेसह आंबेडकरी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेबांबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यसंदर्भात, परभणी आंदोलनातील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत यासोबत बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य जनआक्रोश आंदोलन मोर्चात अमीत शहा मुर्दाबाद मुर्दाबाद!, राजीनामा द्या….राजीनामा द्या! अमित शहा राजीनामा द्या, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा…. विषय असो! अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला होता. सर्व जनमानसात निषेधाची नांदी उमटत होती. यावेळी प्रत्येकाच्या हातात डॉ बाबासाहेबांचा फोटो आणि सुविचारांचे फलक घेऊन आंबेडकरी बांधव निषेध मोर्चात उतरले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर समता सैनिक दलाने सलामी दिली यानंतर मोर्चा समाप्त करण्यात आला. यावेळी बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने संगमेश्वर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १० डिसेंबर २०२४ रोजी एका देशद्रोही समाजकंटकाने महाराष्ट्र राज्यातील परभणी येशील “डॉ. बाबासाहेब, आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना” करून भारत सरकार, महाराष्ट्र शासन तसेच भारतीय नागरिकांनाच आव्हान दिले आहे. त्यांचे हे कृत्य म्हणजे देशद्रोहच आहे. समाजकंटकांच्या अशा राष्ट्रद्रोही कृत्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील वातावरण बिघडले, सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. कोट्यावधी भारतीयांची अस्मिता असणाऱ्या भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षाच योग्य शिक्षा आहे. सदर राष्ट्रद्रोही कृत्याचा निषेध देशातील नागरिकांच्या सर्व थरातून होणे गरजचे होते. कट्टर देशप्रेमी व सजग असलेल्या आबेडकरी अनुयायांनी ह्या घटनेचा जाहीर निषेध करून संविधानावरील आणि भारत राष्ट्रावरील आपली निष्ठा जपली आहे. अशा देशद्रोही कृत्याचा निषेध करतांना काही उस्फुर्त प्रतिक्रिया येणे नैसर्गिक होते. मात्र, पोलीसदलातील काही जातीयवादी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरात घुसून, आंबेडकरी अनुयायांनाच टारगेट करून, निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अमानुषपणे मारहाण केली आहे. एवढेच नाही तर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या श्री. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी ह्या विद्यार्थ्यांचा पोलीसकोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. सामाजिक माध्यमातून प्रसारित झालेल्या अनेक व्हीडिओ मधून पोलिसच लोकांच्या गाड्या फोडून, देशप्रेमी आंबेडकरी अनुयायांनाच दमदाटी करून समाजात अराजकता माजवत असल्याचे सिद्ध होत आहे असे निवेदनात नमूद केले आहे.
यापुढे, दुसऱ्या प्रकरणात “भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करताना विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अव्हेलना होईल” असे जाणीवपूर्वक वक्तव्य करून बाबासाहेबांचा अपमान केला आहे. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे. शासनाला त्याची जात नाही, धर्म नाही हे भारतीय संविधानाने सांगितले असतानाही ” आंबेडकर आंबेडकर आंबेडकर – आंबेडकर – आंबेडकर – आंबेडकर “असे बोलणे फॅशन झाली आहे. एवढा वेळ देवाचं नांव घेतले असते, तर सात वेळा स्वर्गप्राप्ती झाली असती” असे अवैज्ञानिक वाक्य बोलून संविधान विरोधी कृती आणि आंबेडकर द्वेष करणाऱ्या अमित शहा यांचा जाहीर निषेध करीत आहोत. अमित शहाच नव्हे तर देशातील कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक जीवन जगताना संविधानातील नियमानुसारच जगावे लागते, कोणत्या धर्मातील अस्तित्वहीन व कपोलकल्पित गोष्टींवर नाही. याची जाणीव नसणाऱ्या अमित शहा यांना भारताच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून, माननिय राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांनी अमित शहा यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी व अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्या आंबेडकरद्वेष्ट्याला घरी बसवावे, अशी मागणी कोट्यावधी भारतीयांच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
बौध्द समाजाने निवेदनाद्वारे राष्ट्रपतीकडे केल्यात सहा मागण्या
दोन्ही घटनामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे ती सुरळीत व्हावी, देशद्रोही कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना आणि बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्याला धडकी भरावी, भारतीय नागरिकांमध्ये देशप्रेम आणि बाबासाहेबांवरील निष्ठा वाढीस लागावी, निरपराध लोकांचा बळी जावू नये, म्हणून सहा मागण्या करीत आहोत असे म्हटले आहे. यामध्ये परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकाला फाशीची शिक्षा दयावी व ह्या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार तथा मास्टरमाईंडचा शोध घेऊन त्याच्यावरही देशद्रोहाचा खटला दाखल करावा, संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या आणि अवैज्ञानिक बाबींना प्रोत्साहन देऊन देश मानसिक गुलामगिरीत ढकलणाऱ्या अमित शहा यांची गृहमंत्रीपदावरून हाकलपट्टी करावी, जातीयवादी मानसिकतेतून परभणी येथे आंबेडकरी अनुयायांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली लोकांना दमदाटी करून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या तसेच गाड्या फोडणाऱ्या पोलीसांचे निलंबन करून त्यांचेवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या जखमी कार्यकर्त्यांवर मोफत उपचार करावेत, संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीस देशद्रोह समजून फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा मंजूर करावा. अशा एकूण सहा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना देण्यात आले.