(संगमेश्वर)
तालुक्यातील कोंडगाव साखरपा येथे मालमत्तेच्या मोबदल्यात तब्बल १ कोटी ८४ लाख २ हजार २६० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदानंद रमेश सावंत (वय ५१, रा. बाईंगवाडी, कोंडगाव, साखरपा) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी साजन बाळकृष्ण फटकरे (वय २९, रा. तळीवाडी, चांदोर, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदानंद सावंत यांच्या मालकीची कोंडगाव साखरपा येथील घर क्र. ६१३, ११४४ अ, ब व क ही मालमत्ता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६च्या संपादनासाठी घेण्यात आली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये आरोपी साजन फटकरे याने फिर्यादी सावंत यांच्याकडे जाऊन मोबदला लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्या विश्वासास पात्र ठरत फिर्यादीकडून १८ कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या.
यानंतर, सदानंद सावंत यांच्या खात्यावर मालमत्तेच्या मोबदल्यापोटी २ कोटी ७७ लाख ५० हजार ४१६ रुपये जमा झाले. मात्र, ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान, आरोपीने परवानगी न घेता सह्या घेतलेल्या चेकवर रकमा भरून तब्बल १ कोटी ८४ लाख २ हजार २६० रुपये काढले आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. या प्रकारामुळे फिर्यादी व साक्षीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी देवरुख पोलिसांनी आरोपी साजन फटकरे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४६७ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४६८ (फसवणुकीच्या हेतूने बनावट कागदपत्र वापरणे) आणि ४७१ (खोटे दस्तऐवज खरे असल्याचे भासवून वापरणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. या मोठ्या फसवणुकीच्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.