(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अनेक अडचणींना सामोरे जात असतानाही संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर एक आदर्श निर्माण केला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनबद्ध व तत्पर सेवेमुळे गेल्या दोन वर्षांत या केंद्रात दाखल झालेल्या ६८ दंशबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून विशेष म्हणजे या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ‘झिरो डेथ’ पॅटर्नची ही कामगिरी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण ३० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये श्वानदंश, विंचूदंश आणि सर्पदंशाच्या घटना नोंदवण्यात आल्या. एप्रिलमध्ये २ श्वानदंश व १ विंचूदंश, मे महिन्यात ३ श्वानदंश व ३ विंचूदंश, जूनमध्ये ३ श्वानदंश, १ विंचूदंश आणि १ सर्पदंशाचे रुग्ण होते. पुढील महिन्यांतही विखुरलेल्या स्वरूपात रुग्णसंख्या दिसून आली आणि सर्वांवर वेळेत उपचार करून त्यांना सुरक्षित घरी पाठवण्यात आले.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत रुग्णसंख्या वाढून ३८ वर पोहोचली. विशेषतः श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली. एप्रिलमध्ये २ श्वानदंश व १ विंचूदंश, मेमध्ये ४ श्वानदंश व २ विंचूदंश, जूनमध्ये २ श्वानदंश व १ विंचूदंश, जुलैमध्ये २ श्वानदंश, ऑगस्टमध्ये १, सप्टेंबरमध्ये ४ श्वानदंश तर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ६ श्वानदंश व ३ विंचूदंश रुग्ण दाखल झाले. नोव्हेंबरमध्ये १ श्वानदंश व १ सर्पदंश, डिसेंबरमध्ये ३, जानेवारीमध्ये १ आणि मार्चमध्ये ३ श्वानदंश व १ विंचूदंशाच्या रुग्णांवर उपचार करून त्यांना सुरक्षित घरी सोडण्यात आले.
तज्ञांच्या मते, एप्रिल व मे महिन्यातील वाढते तापमान तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात दंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. उष्णतेमुळे साप व विंचू थंड जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात, तर उन्हाळ्यात श्वान अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी घराभोवती स्वच्छता राखणे, रात्री टॉर्चचा वापर करणे आणि शेतात काम करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दंश झाल्यानंतरचा प्रारंभिक काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. बुरंबी आरोग्य केंद्रात प्रत्येक रुग्णाला वेळेत लस व औषधोपचार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जातो. कर्मचाऱ्यांची तत्परता आणि योग्य उपचार पद्धती यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असून, प्रशासनाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तातडीने उपचार मिळाल्यास दंशबाधित रुग्णांचे प्राण वाचवता येतात, हा विश्वास या कामगिरीमुळे अधिक दृढ झाला आहे.

