(खेड)
एका कंपनीत गुंतवणूक केल्यास रक्कमेवर शेअर मार्केटपेक्षा ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत तब्बल 16 लाख 41 हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या राजेशभाई मंगेशभाई अहिरे (33 रा. सुरत-गुजरात) या भामटयास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरत येथे गजाआड केले. त्याच्या अटकेने ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत सचिन सदानंद सावंत (47 रा. चिंचघर-प्रभूवाडी, खेड) यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. ही घटना 16 मे ते 26 जून या कालावधीत घडली होती. त्यांच्या मोबाईलवर मॉर्गन स्टेनली ई ट्रेडींग मेंबर इलाईट क्लास या व्हॉटस्ऍप ग्रुपवरील ट्रेडींग संदर्भातील एसएमएस पाठवला. या मॅसेजद्वारे चार वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून मॉर्गन स्टेनली ई ट्रेडिंग ई ट्रेडिंग या कंपनीमध्ये रक्कम गुंतवल्यास जास्तीत जास्त रक्कमा परतावा देण्याचे आमिष दाखवले.
मोबाईलद्वारे सतत केलेल्या एसएमएसद्वारे विश्वास संपादन करत अनोळखी व्यक्तींनी वेळोवेळी बँकांच्या विविध खात्यातून त्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये ऑनलाईन रक्कम जमा केली. तब्बल 16 लाख 41 हजार रुपयांची अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती दिली. तांत्रिक मुद्यांच्या आधारे पोलीस पथकाने भामटयाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
आरोपी गुजरात राज्यातील दिडोली-सुरत येथील शुभलक्ष्मी रेसिडन्सीमध्ये वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. भामटयाने फसवणूक केलेली रक्कम पोलीस पथकाच्या हाती लागली नसल्याचे समजते. या रक्कमेचे त्याने नेमके काय केले, याचा पोलीस कसून तपास करत आहे. या भामटयाने आणखी कोणाची ऑनलाईन फसवणूक केली आहे का? याचाही पोलीस पडताळा करत आहेत.