(चिपळूण /रत्नागिरी)
ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकराच्या वसुलीतून जमा झालेली एक लाख ४३ हजार ६९ रुपये इतकी रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा न करता सुमारे सात महिने स्वतःकडे ठेवल्याचा आरोप शिरगाव ग्रामपंचायतीशी संबंधित तिघांविरुद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४०८ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरगाव येथील पाटीलवाडीच्या नीता निलेश शिंदे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय दत्ताराम सोलकर (वय ३३), दिनेश दत्ताराम धागडे (वय ४२) आणि श्रीकृष्ण गंगाराम कदम (वय ५०, तिघेही रा. शिरगाव, ता. चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी, वीजकर आदींची वसुली करण्याची जबाबदारी संबंधितांना देण्यात आली होती. वसुली केलेली रक्कम तातडीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरगाव शाखेतील ग्रामपंचायतीच्या बचत खात्यात जमा करणे आवश्यक होते.
मात्र, वसूल केलेल्या रकमेतून एक लाख ४३ हजार ६९ रुपये बँक खात्यात जमा न करता सुमारे सात महिने स्वतःच्या ताब्यात ठेवून वापरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांत अनियमितता झाल्याचा तसेच ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ जून २०१३, ४ जानेवारी २०१७ आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकांचा संदर्भही फिर्यादीत देण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.


