(राजापूर /रत्नागिरी)
पत्नीला बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघालेला २८ वर्षीय तरुण गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना राजापूर तालुक्यातील कोंडये खालचीवाडी येथे उघडकीस आली आहे. निनाद किशोर शिवगण असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो कुठेही आढळून न आल्याने अखेर त्याच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निनाद शिवगण हा २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पत्नी तेजल हिला बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा नातेवाईकांकडे तसेच परिचितांकडे शोध घेतला; परंतु त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. निनाद याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध करण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, अशी तक्रार त्याचे वडील किशोर गणपत शिवगण (वय ५५, रा. कोंडये खालचीवाडी, ता. राजापूर) यांनी दिली आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सहा दिवस उलटूनही तरुणाचा ठावठिकाणा न लागल्याने शिवगण कुटुंबीयांची चिंता वाढली असून, निनाद नेमका कुठे गेला आणि त्याच्यासोबत काय घडले, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.


