(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ला आणि जाळपोळीच्या तब्बल १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणाला आता न्यायालयीन घडामोडींमुळे नवे वळण मिळाले आहे. या गंभीर गुन्ह्यातील एकूण १४ संशयित आरोपींना रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एकाच दिवशी दोन स्वतंत्र जामीन अर्जांवर निर्णय देताना न्यायालयाने १३ संशयित आरोपींच्या समूहासह आणखी एका संशयित आरोपीला अटकेपासून संरक्षण दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी हे आदेश दिले.
प्रत्येक आरोपीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनदारावर अटकेच्या प्रसंगी सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या दिलाशासोबत तपास यंत्रणेला सहकार्य करण्याची आणि नियमित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अटही घालण्यात आली आहे. १८ एप्रिल २०११ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधीत सुमारे ८०० ते ९०० महिला-पुरुषांच्या जमावाने नाटे पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जमावाने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली, तसेच पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलीस ठाणे आणि पोलीस व्हॅनला आग लावण्यात आली. या जाळपोळीत सुमारे १६ लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप तपासातील तक्रारीत करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०९/२०११ दाखल करण्यात आला. भारतीय दंड विधानातील खुनाचा प्रयत्न, कटकारस्थान, दरोडा, बेकायदा जमाव, दंगल, पोलिसांवर हल्ला, कर्तव्य बजावण्यात अडथळा आणि जाळपोळ यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या कलमांसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणाऱ्या आरोपींनी आपण साखरीनाटे येथील कायमस्वरूपी रहिवासी असून कुटुंब आणि मालमत्ता याच परिसरात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या गुन्ह्यातील काही आरोपींविरुद्ध यापूर्वी आरोपपत्र दाखल झाले होते. त्यांचा खटला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे आपल्यालाही अटकपूर्व संरक्षण मिळावे, अशी मागणी अर्जदारांनी केली होती. या युक्तिवादाला तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्याचीही जोड मिळाली. या प्रकरणातील प्रमुख आरोपींची २१ एप्रिल २०१५ रोजी निर्दोष मुक्तता झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. याच गुन्ह्यातील अन्य नऊ सहआरोपींना ३ डिसेंबर २०२५ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची बाबही न्यायालयासमोर मांडण्यात आली. विशेष म्हणजे, संबंधित आरोपींना काही अटी व शर्तींवर जामीन देण्यास अभियोजन पक्षाने हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
मूळ तक्रार, तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आणि सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार करताना न्यायालयाने हा गुन्हा २०११ मधील असल्याचे अधोरेखित केले. यापूर्वी काही संशयित आरोपींना अटक होऊन त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यांचा खटलाही पूर्ण झाला आहे. अर्जदारांना अटक करण्यासाठी कोणतीही नवीन कारणे दिसून येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. अर्जदार तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कोठडीत ठेवणे आवश्यक नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही जामीन अर्ज मंजूर केले. अटकेची भीती आणि कोठडीची आवश्यकता यासंदर्भातील बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने संशयित आरोपींना अटकपूर्व संरक्षण दिले.
पुराव्यांत हस्तक्षेपासही मनाई
न्यायालयाने जामीन मंजूर करताना संशयित आरोपींवर स्पष्ट अटी घातल्या आहेत. सर्व १४ आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार द्यावा लागणार आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अशाच प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये आणि अभियोजन पक्षाच्या पुराव्यांमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये, असेही न्यायालयाने बजावले आहे. अर्जदारांच्या वतीने ॲड. क्रितिका दावर यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे ॲड. पी. आर. साळवी यांनी काम पाहिले.
एकाच दिवशी १४ आरोपींना दिलासा
अटकपूर्व जामीन मिळालेल्यांमध्ये अकबर जिक्रिया सोलकर, शोएब हुसेन भाटकर, अल्कासी मुनव्वर पटेल, मुफिज माजिद गोवळकर, मुश्ताक बिलाल मिरकर, रियाज अब्दुल्ला सोलकर, जिलानी अब्दुल हमीद सोलकर, करीम मोहम्मद फणसोपकर, अब्बास हमीद गोवळकर, नासिर इशाक ढालवेलकर, शौकत इशाक ढालवेलकर, अलाउद्दीन इशाक ढालवेलकर, सुलतान इब्राहिम गोवळकर आणि अल्ताफ अब्दुल रझाक सोलकर यांचा समावेश आहे.


