(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १०० खेळाडूंनी सहभाग घेत विविध प्रकारांत आपले कौशल्य दाखवले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या अंतर्गत स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी, तालुका, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवनिर्माण हायस्कूल, एमआयडीसी, रत्नागिरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांतील सुमारे १०० स्केटिंगपटूंनी सहभाग नोंदवला. क्वाड स्केट आणि इनलाइन स्केट या दोन प्रकारांत रोड रेस, रिंक-१ आणि रिंक-२ अशा प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी शिवसेना महिला उपशहर प्रमुख सौ. कामना अरुण बेग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी खेड तालुका सचिव श्री. विजय निगडेकर, चिपळूण तालुका सचिव सौ. योगिता पाटणे, दापोली तालुक्याचे श्री. प्रथमेश दाभोळे, चिपळूणचे श्री. विनोद राऊत, रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. अरुण बेग तसेच विविध शाळांतील क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
क्वाड स्केट प्रकारातील विजेते
११ वर्षांखालील मुलांच्या गटात सुनील मेश्राम याने प्रथम, स्वतेज लाड याने द्वितीय, तर शिवांश केनन याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात आराध्या पाटणे हिने प्रथम, आदिती लाल हिने द्वितीय, तर सांगवी पिळणकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांत नागले प्रथम, आरव महाडिक द्वितीय आणि जय पाड्लेकर तृतीय ठरले. मुलींच्या गटात सानवी दरेकर हिने प्रथम, तीर्था खाडे हिने द्वितीय, तर अलिषा परकर हिने तृतीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांत सनगरे याने प्रथम, हर्ष आंब्रे याने द्वितीय, तर स्मित जाधव याने तृतीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात निशांत जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला.
इनलाइन स्केट प्रकारातील विजेते
११ वर्षांखालील मुलांच्या गटात मुसा खान याने प्रथम, ललित मुरकर याने द्वितीय, तर जाकीर पटेल याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात मुक्ता गोविलकर हिने प्रथम, सिमरा चाऊस हिने द्वितीय, तर इन्शा पटेल हिने तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक डेरे प्रथम, माझीन मुकादम द्वितीय आणि अरसलान खान तृतीय ठरले. मुलींच्या गटात ऐश्वर्या सावंत हिने प्रथम, मायशा चाऊस हिने द्वितीय, तर अनिया नागदेवे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ध्रुव बसणकर याने प्रथम, स्वराज पवार याने द्वितीय, तर हेरंब लोंढे याने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना क्रीडा अधिकारी श्री. गणेश जगताप सर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे सर यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पालकवर्ग आणि स्केटिंग असोसिएशन रत्नागिरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


