(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
देवरुख जवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील डोंगरावरून दगड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील अवघ्या चार वर्षांच्या ऋत्वी संदीप पाटील या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राज्य पातळीवर उमटू लागले असून, आमदार रोहित पाटील यांनी ‘एक्स’ (ट्विटर) द्वारे आक्रमक पवित्रा घेत प्रशासन आणि ठेकेदारावर ताशेरे ओढले आहेत. देवाच्या दारात मानवी हलगर्जीपणाचा हा संतापजनक बळी गेला असून, हा निसर्गाचा प्रकोप नसून ठेकेदार व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा खून आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीररीत्या सुरुंग स्फोट घडवून आणल्याने डोंगरावरील खडक सैल होऊन हा अनर्थ घडल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. यापूर्वी ५ जानेवारी, १५ फेब्रुवारी आणि ३० एप्रिल रोजी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाव्य धोक्याबाबत वारंवार लेखी इशारे दिले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. एवढेच नव्हे, तर भाविकांच्या सुरक्षेसाठी घटनास्थळी साधा धोक्याचा फलकही लावण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी आपल्या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदय सामंत, इंद्रनील नाईक आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांना टॅग करत संबंधित दोषी ठेकेदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा (BNS / IPC 304) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या व भाविकांच्या जिवाशी खेळणाऱ्या हलगर्जी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. निष्पाप ऋत्वीच्या मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी हा अत्यंत गंभीर विषय आगामी विधानभवनाच्या अधिवेशनात तीव्रतेने मांडण्यात येईल आणि या प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशाराही आमदार रोहित पाटील यांनी दिला आहे.


