(मुंबई / वृत्तसंस्था)
‘सैराट’मधील आर्चीच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आता एका नव्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत विविध व्यक्तिरेखांमधून आपल्या अभिनयाची क्षमता दाखवणारी रिंकू आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटात प्रथमच अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा रहस्य, थरार आणि दमदार अॅक्शनने भरलेला ट्रेलर नुकताच मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमधील रिंकूचा लढवय्या अंदाज आणि कथानकाभोवती निर्माण केलेले गूढ यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’मध्ये एका स्त्रीचा संघर्ष, तिचे स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. स्त्रीची ओळख केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांपुरती मर्यादित नसून स्वतःचे अस्तित्व आणि सन्मान टिकवण्यासाठी तिला करावा लागणारा संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे, हा आशय चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत प्रत्येक स्त्री रोज नव्या आव्हानांना सामोरी जात असते. मात्र, या धावपळीत तिची सुरक्षितता, तिचे अस्तित्व आणि स्वाभिमान यांचे काय? अन्याय सहन करणे हीच तिची नियती आहे की त्याविरोधात ठामपणे उभे राहण्याची ताकदही तिच्यात आहे? अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार करणाऱ्या स्त्रीचे सामर्थ्य आणि तिच्यातील आक्रमक रूप किती प्रभावी ठरू शकते, याची उत्कंठावर्धक कहाणी आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
ट्रेलरमध्ये सुरुवातीपासूनच रहस्यमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. अंधाराने व्यापलेले जंगल, निर्मनुष्य रस्ता, बसमधील प्रवास आणि त्याभोवती घडणाऱ्या संशयास्पद घटना यांसोबतच पोलिसांची तपासासाठी सुरू असलेली धावपळ कथानकातील उत्कंठा वाढवते. या पार्श्वभूमीवर रिंकूचे अॅक्शन दृश्य विशेष लक्षवेधी ठरतात. तिच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात नेमके काय घडले आहे, ती कोणत्या संकटाशी सामना करत आहे आणि तिच्या संघर्षामागील रहस्य काय आहे, याबाबत ट्रेलरमध्ये कोणताही खुलासा न करता सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखांमधील परस्परसंबंध आणि कथानकातील गुंतागुंतीची झलक ट्रेलरमधून समोर आली आहे. त्यामुळे ‘जिजाई’मध्ये अॅक्शन आणि रहस्याबरोबरच भावनिक व सामाजिक आशयालाही महत्त्व देण्यात आल्याचे दिसते.
चित्रपटाचे दिग्दर्शक तृशांत फुलवंती इंगळे यांनी चित्रपटाच्या संकल्पनेविषयी सांगितले, “स्त्रीच्या आयुष्याकडे पाहताना अनेकदा तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि इतरांसाठी केलेल्या त्यागाचीच चर्चा होते. मात्र, या सगळ्यापलीकडे तिच्या स्वतःच्या इच्छा, तिचा स्वाभिमान आणि तिच्या वाट्याला येणारा संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘जिजाई’च्या माध्यमातून अशाच एका स्त्रीचा प्रवास आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी ती जेव्हा उभी राहते, तेव्हा तिच्यातील सामर्थ्य कसं प्रकट होतं, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रिंकूने या भूमिकेला अतिशय प्रभावी न्याय दिला आहे.”
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही चित्रपटाच्या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “स्त्रीचं स्वातंत्र्य, तिचं अस्तित्व आणि स्वतःचा सन्मान जपण्याचा तिचा अधिकार हे विषय आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. ‘जिजाई’मधून या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. रिंकू राजगुरूने साकारलेली व्यक्तिरेखा तिच्या संघर्षातून प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला भाग पाडेल. हा चित्रपट प्रेक्षकांना भावेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
रिंकू राजगुरूने यापूर्वी ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’ आणि ‘आठवा रंग प्रेमाचा’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधून, तर ‘200 हल्ला हो’ आणि ‘अनपॉज्ड’ या हिंदी प्रकल्पांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. आता ‘जिजाई’मधील अॅक्शनप्रधान भूमिकेतून ती नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून नुपूर गुहा आणि तुषार राऊत सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले आहे, तर गुलराज सिंग यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रहस्य, थरार, अॅक्शन आणि स्त्रीच्या स्वाभिमानाचा विषय घेऊन येणारा ‘जिजाई’ येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


