(संगमेश्वर / एजाज पटेल)
पोलीस दलातील अधिकारी म्हटले की कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारी खाकी वर्दी डोळ्यांसमोर येते. मात्र, या वर्दीमागे संवेदनशील मनही असते, याचा प्रत्यय संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गावित यांनी आपल्या कृतीतून दिला. संगमेश्वर एसटी बसस्थानक आणि सोनवी चौक परिसरात काही दिवसांपासून भटकणाऱ्या एका असहाय्य मनोरुग्ण महिलेच्या मदतीसाठी त्यांनी स्वतःच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी साध्या वेशात धाव घेतली. तिला खाऊ घालण्यापासून ते सुरक्षित निवाऱ्यात पोहोचवण्यापर्यंत त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे जबाबदारी पार पाडली. ‘माहेर” संस्थेच्या वाहनातून ही महिला रवाना होत असताना तिचा निरोप घेताना गावित यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
संगमेश्वर एसटी बसस्थानक आणि सोनवी चौक परिसरात ही महिला गेल्या काही दिवसांपासून फिरत होती. तिचे बोलणे, वागणे आणि एकंदर अवस्था पाहता ती मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याचे जाणवत होते. ती हिंदी भाषेत असंबद्ध बोलत होती. कधी मोठ्याने ओरडणे, तर कधी विचित्र हावभाव करणे असे तिचे वर्तन होते. अशा परिस्थितीत रस्त्यावर राहणाऱ्या अशा व्यक्तीला भूक, तहान, ऊन-पाऊस, आजारपण आणि सुरक्षिततेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या महिलेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रमेश गावित यांनी तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
विशेष म्हणजे, त्या दिवशी त्यांची साप्ताहिक सुटी होती. तरीही महिलेची असहाय्य अवस्था त्यांच्या मनाला अस्वस्थ करून गेली. त्यांनी साध्या वेशात संगमेश्वर येथे जाऊन तिचा शोध घेतला. तिच्याशी संवाद साधताना पोलिसी धाक न दाखवता आपुलकीने बोलण्यावर त्यांनी भर दिला. तिचे कुटुंबीय कोण, ती कुठून आली आहे किंवा तिच्याशी संपर्क साधण्यासाठी काही माहिती मिळू शकते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी शांतपणे केला. दरम्यान, ती भुकेली असल्याचे लक्षात येताच तिला एका हॉटेलमध्ये नेऊन जेवणही दिले. सुटीच्या दिवशीही एका अनोळखी आणि असहाय्य महिलेच्या मदतीसाठी त्यांनी दाखवलेली तत्परता माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली.
या महिलेला सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी गावित यांनी निवळी येथील माहेर संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर संस्थेचे वाहन तिला घेण्यासाठी संगमेश्वर येथे पोहोचले. मात्र, सुरुवातीला अनोळखी वाहनात बसण्यास महिलेने नकार दिला. तिच्या मनात भीती असल्याचे लक्षात येताच गावित यांनी पुन्हा तिच्याशी संवाद साधला. ‘दीदी, मैं तुम्हारा बड़ा भाई हूँ तुम्हें एक सुरक्षित जगह पर भेज रहा हूँ वहाँ तुम्हारे रहने और खाने-पीने की पूरी व्यवस्था होगी, तुम बिल्कुल चिंता मत करो,’ अशा शब्दांत त्यांनी तिला धीर दिला. मोठ्या भावाच्या मायेने समजावून सांगत तिच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
महिलेच्या पिशव्या वाहनात ठेवतानाही गावित यांनी स्वतःच तिचे सामान उचलून गाडीत ठेवले. तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्वीकारत त्यांनी तिला विश्वास दिला. अखेर त्यांच्या प्रेमळ संवादामुळे महिलेची भीती कमी झाली आणि ती माहेर संस्थेच्या वाहनात बसण्यास तयार झाली. वाहन निघण्याच्या वेळी गावित यांच्या चेहऱ्यावर समाधान होते; मात्र तिचा निरोप घेताना ते भावूक झाले. त्या असहाय्य महिलेला सुरक्षित आधार मिळत असल्याचे समाधान आणि तिच्यापासून निरोप घेण्याची भावना त्यांच्या डोळ्यांत दिसत होती.
यावेळी माहेर संस्थेच्या वतीने छाया सूर्यकांत दळवी, मंगल शिवराम जाधव या सेविका तसेच वाहनचालक आशिष विजय मुळ्ये उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक रमेश गावित यांनी या महिलेला माहेर संस्थेच्या प्रतिनिधींच्या स्वाधीन केले. त्यामुळे आता तिला सुरक्षित निवारा, भोजन आणि आवश्यक ती काळजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावित यांची ही सामाजिक बांधिलकी एका घटनेपुरती मर्यादित नाही. गेल्या वर्षभरात त्यांनी संगमेश्वर परिसरातील अशा चार मनोरुग्ण व्यक्तींना माहेर संस्थेचा आधार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी जयगड, गणपतीपुळे आणि रत्नागिरी येथे कार्यरत असतानाही त्यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या असहाय्य व्यक्तींना अन्न, पाणी आणि कपडे उपलब्ध करून दिले. तसेच त्यांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी आश्रम आणि संबंधित संस्थांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. पोलीस खात्यातील नियमित कर्तव्ये पार पाडतानाच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी जपलेली संवेदनशीलता विशेष कौतुकास्पद आहे.
मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना केवळ रस्त्यावरून हटवणे हा त्यावरील उपाय ठरू शकत नाही. अशा व्यक्तींना योग्य उपचार, समुपदेशन, सुरक्षित निवारा आणि माणुसकीची वागणूक मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंबापासून दुरावलेल्या किंवा स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींकडे समाजाने दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. अशा वेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी स्वतःहून पुढाकार घेतात, तेव्हा संबंधित व्यक्तीला सुरक्षिततेसोबतच जगण्याचा नवा आधार मिळू शकतो.
कायद्याचे रक्षण करताना माणुसकीचे भान जपणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रमेश गावित यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. खाकी वर्दीचा अधिकार केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्यापुरता मर्यादित नसून, गरजू आणि असहाय्य व्यक्तींच्या मदतीसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.


