(प्रयागराज)
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील सर्वात मोठा धार्मिक वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर वादग्रस्त टीका करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी ऊर्फ यामाई ममता नंद गिरी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा किन्नर आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केली.
आखाड्याशी आता कोणताही संबंध नाही
डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितले की, आखाड्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची अधिकारी किंवा सदस्य राहिलेली नाही. आखाड्यात महिला, पुरुष आणि किन्नर सर्वांचा समावेश असून आम्हाला कोणताही धार्मिक किंवा सामाजिक वाद नको आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी मौनी अमावस्येच्या दिवशी बटुक ब्राह्मणांवर शिखा धरून मारहाण झाल्याच्या घटनेवरही किन्नर आखाड्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे कारवाई
२५ जानेवारी रोजी ममता कुलकर्णी यांनी शंकराचार्य वादावर प्रतिक्रिया देताना खळबळजनक विधान केले होते. त्यांनी दावा केला होता की दहा पैकी नऊ महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे असून त्यांना अध्यात्मिक ज्ञान नाही. याशिवाय त्यांनी शंकराचार्यपदी नियुक्ती कोणी केली आणि कोट्यवधी भाविकांच्या गर्दीत पालखी काढण्याची गरज काय होती, असे थेट प्रश्न उपस्थित केले होते. याच वक्तव्यांमुळे किन्नर आखाड्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
“हकालपट्टी नाही, मी स्वतः राजीनामा दिला” – ममता कुलकर्णी
दरम्यान, किन्नर आखाड्यातून काढल्याच्या वृत्तावर ममता कुलकर्णी यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. माझी हकालपट्टी झालेली नसून मी स्वतः महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे, असा दावा त्यांनी केला आहे. महामंडलेश्वर पद हे अनेक वर्षांच्या कठोर आध्यात्मिक तपस्येनंतर मिळते. खरा महंत किंवा महामंडलेश्वर होण्यासाठी दीर्घ काळ ध्यान, संयम आणि शिस्त आवश्यक असते. हे लक्षात आल्यानंतरच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र होत असून धार्मिक क्षेत्रात याचे पडसाद उमटत राहण्याची शक्यता आहे.

