(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण रुग्णांना गावपातळीवरच दर्जेदार उपचार उपलब्ध होणार असून, शहरांकडे धाव घेण्याचे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
हे अभियान केवळ आरोग्य सुविधा वाढवण्यापुरते मर्यादित नसून, गावकऱ्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यावर भर देणारे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे अधिक सक्षम करून वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संसर्गजन्य आजारांसोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही गावपातळीवर विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्याच्या ५९ निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला राज्यस्तरावर ५ कोटी रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल. याशिवाय विभागस्तरावर १ कोटी आणि जिल्हास्तरावर २५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या निधीचा उपयोग गावातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी केला जाणार आहे.
मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाणार असून, शासनाचे पथक प्रत्यक्ष गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे. माता व बालमृत्यू दर कमी करणे, सुरक्षित पाणीपुरवठा, स्वच्छता राखणे आणि आजारांना प्रतिबंध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
राज्य शासनाचा हा उपक्रम ग्रामीण महाराष्ट्रासाठी आरोग्यदायी दिशादर्शक ठरणार असून, गावागावात आरोग्याबाबत जागरूकता आणि स्वावलंबनाची नवी संस्कृती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

