(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील रानपाट गोणबरेवाडी येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध बचाव मोहिमेद्वारे जेरबंद केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षितपणे ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत तो निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
रानपाट गोणबरेवाडी येथील रहिवासी अनंत रामा गोणबरे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटलांनी वन विभागाला कळविले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. खुराड्यात बिबट्या शांतपणे बसलेला असल्याचे दिसून आले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी नियोजन आखले. खुराड्याच्या दरवाजाला लोखंडी ग्रील आणि प्लायवूड लावून तो अर्धवट बंद करण्यात आला. त्यानंतर दरवाजासमोर लोखंडी पिंजरा लावण्यात आला. योग्य नियोजन आणि सावध हालचालींमुळे बिबट्या कोणतीही इजा न होता थेट पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या सुरक्षितपणे पकडला गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जेरबंद बिबट्याची जाकादेवी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्या निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. ही मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, कांदळवन कक्षाचे किरण पाचारणे व धनंजय यादव, तसेच महेश धोत्रे आणि दीपक कदम यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. वन विभागाने दाखवलेली तत्परता आणि नियोजनबद्ध कारवाई यामुळे संभाव्य धोका टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


