(संगमेश्वर / एजाज पटेल)
“मुका प्राणी असला म्हणून काय झाले, शेवटी तोही एक जीवच आहे,” या संवेदनशील भावनेतून वाहतूक शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज चव्हाण यांनी जखमी घोरपडीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री येथे घडलेल्या या प्रसंगात घोरपडीला वाचवण्यात यश आले नाही. मात्र, मृत्यूनंतरही तिची अवहेलना होऊ नये, यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला तिचे दफन केले. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे संगमेश्वर परिसरात कौतुक होत आहे.
वाहतूक शाखेत चालक म्हणून कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज चव्हाण हे इंटरसेप्टर वाहनातून महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जात होते. त्यावेळी वांद्री येथे महामार्गाच्या मध्यभागी त्यांना एक घोरपड जखमी अवस्थेत दिसली. भरधाव वाहनांची वर्दळ सुरू असताना हा मुका जीव वेदनेने विव्हळत होता.
अशा परिस्थितीत अनेक जण दुर्लक्ष करून पुढे निघून जातात; मात्र चव्हाण यांनी तसे केले नाही. मुक्या प्राण्याचाही जीव मोलाचा असतो, या भावनेतून त्यांनी तातडीने आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि घोरपडीच्या मदतीसाठी धाव घेतली.
वाहनातून खाली उतरल्यानंतर चव्हाण यांनी जखमी घोरपडीला पाणी पाजण्याचा आणि तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. गंभीर दुखापतीमुळे घोरपडीची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. तिला वाचवण्यासाठी त्यांनी शक्य ते प्रयत्न केले; मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.
घोरपडीचा मृत्यू झाल्यानंतरही तिचा मृतदेह महामार्गावर पडून राहू नये आणि वाहनांच्या चाकांखाली येऊन त्याची अवहेलना होऊ नये, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी मृत घोरपडीला सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला घेतले.
स्थानिकांच्या मदतीने घोरपडीचे दफन
त्यानंतर सूरज चव्हाण यांनी परिसरातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत रस्त्याच्या कडेला खड्डा खोदला आणि घोरपडीचे दफन केले. कर्तव्य बजावत असताना एका मुक्या प्राण्याप्रती दाखवलेली ही करुणा आणि मृत्यूनंतरही त्याला सन्मानाने निरोप देण्याची कृती उपस्थितांच्या संवेदनशीलतेला साद घालणारी ठरली.
कायद्याची अंमलबजावणी करताना कठोर भूमिका घेणाऱ्या खाकी वर्दीमागेही माणुसकीने ओथंबलेले मन असते, याचा प्रत्यय या घटनेतून आला. कोणताही गाजावाजा न करता केवळ एका मुक्या जीवाप्रती असलेल्या करुणेतून सूरज चव्हाण यांनी केलेल्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रत्येक सजीवाचा जीव महत्त्वाचा असतो आणि माणुसकी केवळ माणसांपुरती मर्यादित नसते, हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला आहे.


