(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील कोकणनगर परिसरातून १९ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेम प्रविण खाकोडीया असे या तरुणाचे नाव असून, तो बौद्धिक दिव्यांग असल्याचे त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. घराच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेलेला मुलगा बराच वेळ होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत आईने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम खाकोडीया (वय १९) हा रत्नागिरीतील मजगाव रोड येथील आलिशान कॉर्नर, कोकणनगर परिसरात कुटुंबासह राहतो. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास तो चिडचिड करत असल्याने त्याच्या आईने, गंगा प्रविण खाकोडीया (वय ३८), त्याला घराच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर जाऊ दिले. काही वेळाने आईने बाहेर पाहिले असता प्रेम दिसून आला नाही.
त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. रत्नागिरी शहर परिसर आणि रेल्वे स्थानक येथेही शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र प्रेमचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत गंगा खाकोडीया यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


