(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
गणरायाला निरोप देण्यासाठी सोनवी नदीच्या पात्रात उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू होतो आणि त्याच वेळी त्याचे वडील थोडक्यात बचावतात, ही केवळ एक दुर्दैवी घटना म्हणून नोंदवून विषय संपविणे प्रशासनाला परवडणारे नाही. कारण या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील कथित धोकादायक खड्डे, त्यांची निर्मिती नेमकी कशामुळे झाली, त्याबाबत संबंधित यंत्रणांना पूर्वकल्पना होती का, तसेच गणेश विसर्जनासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती का, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
माभळे येथे शनिवारी सायंकाळी गणपती विसर्जनावेळी सोनवी नदीत पिता-पुत्र बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे पुरुषोत्तम घडशी यांना वाचविण्यात यश आले; मात्र त्यांचा मुलगा प्रज्वल पुरुषोत्तम घडशी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, नदीपात्राच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुरुषोत्तम घडशी हे मुलगा प्रज्वल, कुटुंबीय आणि ग्रामस्थांसह आरतीनंतर गणपती विसर्जनासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्यासमोरील सोनवी नदीकाठी गेले होते. विसर्जन सुरू असताना पाण्याची खोली आणि नदीपात्रातील परिस्थितीचा अंदाज न आल्याने पिता-पुत्र खोल पाण्यात ओढले गेल्याचे सांगण्यात येते.
पिता-पुत्र बुडत असल्याचे लक्षात येताच गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी मदतीसाठी धाव घेतली. प्रज्वलने आजोबांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या प्रवाहात त्याचा हात निसटला. दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी नदीत उडी घेत पुरुषोत्तम यांना बाहेर काढले. त्यानंतर इतर तरुणांनी सुमारे २० मिनिटे शोध घेत प्रज्वलला पाण्यातून बाहेर काढले. मात्र त्याला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेनंतर गुणाजी घडशी यांनी नदीपात्रातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी गाळ उपशाच्या नावाखाली नदीपात्रात मोठे खड्डे तयार करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. पूर्वी तुलनेने सपाट असलेल्या पात्रात अचानक खोलगट भाग निर्माण झाल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“नदीपात्रातील हे खड्डे बुजविण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच माझ्या नातवाचा जीव गेला,” असा आरोप गुणाजी घडशी यांनी केला असून, संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्र प्रशासकीय अथवा तांत्रिक चौकशी होणे आवश्यक आहे. नदीपात्रातील खड्डे नेमके कोणाच्या परवानगीने निर्माण झाले? गाळ उपशासाठी परवानगी होती का? परवानगीच्या अटींचे पालन झाले का? खड्ड्यांची खोली आणि स्थान याची नोंद संबंधित यंत्रणेकडे होती का? या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होऊ शकतील.
गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सार्वजनिक उत्सव. विसर्जनाच्या दिवशी नदी, तलाव, समुद्रकिनारे आणि घाटांवर नागरिकांची मोठी गर्दी होणार, हे प्रशासनाला आधीपासूनच ज्ञात असते. अशा वेळी धोकादायक ठिकाणे निश्चित करून तेथे बॅरिकेडिंग, इशारा फलक, जीवरक्षक, प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा पथक तैनात करणे ही प्रतिबंधात्मक यंत्रणेची मूलभूत जबाबदारी ठरते. मग सोनवी नदीपात्रातील धोकादायक भागाची प्रशासनाला माहिती होती का? माहिती असल्यास तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? आणि माहितीच नव्हती, तर नदीपात्राची पाहणी कोणी केली होती? या प्रश्नांची उत्तरे आता केवळ कागदावरील अहवालातून नव्हे, तर प्रत्यक्ष चौकशीतून मिळायला हवीत. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एखाद्या नागरिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर पंचनामा, आकस्मिक मृत्यूची नोंद आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया होणे ही नियमित बाब आहे. परंतु या दुर्घटनेमागे मानवनिर्मित परिस्थिती असल्याचा आरोप समोर येत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी करणे तितकेच आवश्यक आहे. महामार्गाचे चौपदरीकरण विकासासाठी आवश्यक असेल, मात्र विकासकामाच्या नावाखाली सार्वजनिक वापरातील नदीपात्र अधिक धोकादायक बनत असेल, तर त्या कामाच्या नियोजनाची आणि देखरेखीची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. विकासकाम आणि नागरिकांची सुरक्षितता यापैकी एकाची निवड करण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये; दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे हीच यंत्रणेची खरी कसोटी आहे.
प्रज्वलचा मृत्यू केवळ एका कुटुंबाची शोकांतिका म्हणून विस्मृतीत जाऊ नये. या दुर्घटनेतून धोकादायक ठिकाणे ओळखून ती सुरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर कदाचित पुढील जीवितहानी टाळता येईल. या घटनेनंतर माभळे आणि संगमेश्वर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नदीपात्रातील धोकादायक भाग तातडीने सुरक्षित करावा, विसर्जनाच्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि या दुर्घटनेच्या सर्व कारणांची चौकशी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


